पुणे (Pune) : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील (Mumbai-Pune Expressway) बोरघाटात शनिवारी (ता. २४) वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे घाटातील वाहतुकीचा चांगलाच खोळंबा झाला. नाताळ व नववर्षानिमित्तच्या सुट्यांमुळे पर्यटक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहेत. द्रुतगती मार्गावर वाहनांची वाढलेली संख्या व त्यात बोरघाटात सुरू असलेली रस्त्यांची कामे यामुळे वाहनचालकांना शुक्रवार रात्रीपासूनच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
पर्यटकांची संख्या वाढल्याने घाटात पुणे लेनवर बोरघाट पोलिस चौकी दस्तुरी, अमृतांजन पूल ते खंडाळा बोगदा दरम्यान तर मुंबई बाजूकडे खंडाळा एक्झिट ते नवीन अमृतांजन पुलादरम्यान वाहनांच्या पाच ते सहा किलोमीटर लांब रांगा लागल्या. शनिवारी वाहतूक जवळपास दोन तास ठप्प झाल्याने प्रवाशांसह वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला. खंडाळा आणि लोणावळ्यातही महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. बोरघाट, खंडाळा महामार्ग पोलिसांच्यावतीने वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. वाहतूक सुरळीत करताना बोरघाट (दस्तुरी), खंडाळा टॅपच्या वाहतूक पोलिसांना नाकी-नऊ आले. दरम्यान, पोलिसांनी वाहतूक पर्यायी मार्गाने तसेच विरुद्ध मुंबई बाजूने वळवली.
नाताळला जोडून आलेल्या सलग सुट्यांमुळे आलेल्या पर्यटकांमुळे लोणावळा, खंडाळा पर्यटकांनी फुलून गेला आहे. शहरातील चिक्की दुकानांमध्ये पर्यटकांची वर्दळ होती. कार्ला, भाजे लेणी, तसेच आई एकवीरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. राजमाची उद्यान, लायन्स पॉइंट, नारायणी धाम येथे जाण्यास पर्यटकांनी पसंती दिली.
पर्यटनस्थळी हुल्लडबाजी व अनुचित प्रकार रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी व सहायक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली हॉटेल, बंगले, कॅम्पिंग, टेन्ट व्यावसायिकांची बैठक घेत त्यांना सुरक्षेबाबत सूचना देण्यात आल्या. पर्यटकांनादेखील पर्यटनस्थळी येताना व पर्यटनाचा आनंद घेताना इतरांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्या असे आवाहन करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करणे, मद्यपान करून वाहने चालविणे, मोठ्या आवाजात स्पीकर लावत शांततेचा भंग करणे असे प्रकार करताना आढळल्यास कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.