पिंपरी (Pimpri) : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (Mumbai Pune Expressway) नव्यानेच सुरू केलेल्या ‘आयटीएमएस’ प्रणालीच्या (इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम - ITMS) आधारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर करडी ‘नजर’ ठेवण्यास सुरुवात झाली आहे.
या प्रणालीच्या मदतीने पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) पाच लाख वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. मात्र, त्याबरोबरच ‘आरटीओ’कडून नियम मोडणाऱ्या वाहन चालकांचे समुपदेशन देखील केले जात आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहनचालकांची सुरक्षा विचारात घेऊन अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने गेल्या सहा महिन्यांपूर्वी संपूर्ण ९० किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर ‘आयटीएमएस’ प्रणाली बसवण्याचे काम हाती घेतले होते. ते सध्या पूर्ण झाले असून ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.
राज्य शासन आणि पिंपरी-चिंचवड, पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून त्यावर नियंत्रण ठेवले जात आहे. दोन्ही विभागांचे प्रत्येकी एकेक सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी त्यावर देखरेख ठेवत आहेत.
कोणत्या कारणास्तव दंड...
अतिवेगाने वाहन चालवणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे, लेन कटिंग आदींसह विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर ‘आयटीएमएस’ प्रणालीच्या आधारे देखरेख करण्यात आली. त्यामध्ये दोषी आढळलेल्या वाहनांना दंड ठोठाविण्यात आला आहे. तब्बल पाच लाख वाहनांकडून पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयाने हा दंड वसुल केला आला आहे.
वाहनचालकांचा नियमांचे पालन करण्याकडे कल वाढला आहे. जून महिन्यांपासून म्हणजेच जवळपास पाच महिन्यांत जवळपास पाच लाख वाहनांवर दंड करण्यात आला आहे. द्रुतगती मार्गावर जाताना २० आणि येताना १९ अशा ३९ ग्याट्री आहेत. त्या माध्यमातून नजर ठेवण्यात येत आहे.
- राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड