पुणे (Pune) : राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) दिवाळीच्या काळात जादा गाड्यांची वाहतूक केल्याने प्रवाशांची मोठी सोय झाली. दिवाळीच्या दहा दिवसांत पुणे विभागाला सुमारे १० कोटींचे उत्पन्न प्राप्त झाले. तर सुमारे १४ लाख प्रवाशांची वाहतूक झाली.
पुणे विभागाच्या ८०० गाड्यांच्या माध्यमातून एसटीच्या सुमारे २५ हजार फेऱ्या झाल्या. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पन्नात दीड ते दोन कोटी रुपयांची वाढ झाल्याचे एसटी प्रशासनाचे म्हणणे आहे.
पुणे विभागाच्या स्वारगेट, वाकडेवाडी यांसह खडकी येथे उभारण्यात आलेल्या बसस्थानकावरून प्रवाशांनी मोठ्या संख्येने प्रवास केला. पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक होती. विशेषतः सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अहिल्यानगर आदी शहरात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त होती. त्यामुळे एसटी प्रशासनाने फेऱ्या वाढविण्यावर भर दिला.
यंदाच्या वर्षी केवळ पुणे विभागातील एसटी गाड्यांच्या २५ हजार फेऱ्या झाल्या. सार्वधिक प्रवाशांची वाहतूक ३ नोव्हेंबर भाऊबीज दिवशी झाली. यादिवशी पुण्यातून एक लाख ५५ हजार प्रवाशांनी एसटीने प्रवास केला.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा प्रवासी वाहतूक जास्त झाल्याने प्रवासी उत्पन्नातदेखील वाढ झाली. प्रवाशांना गाड्या वेळेवर उपलब्ध होण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले. जादा गाड्यांची वाहतूक केल्याने प्रवाशांची मोठी सोय झाली.
- प्रमोद नेहूल, विभागीय नियंत्रक, एसटी विभाग, पुणे