पुणे (Pune) : महाराष्ट्रातील ग्रामीण भागाची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या एसटीचा (ST Bus) प्रवास खडतर स्थितीत सुरू आहे. राज्यातील १६ हजार एसटी बसेसपैकी ७ हजार बसेसची स्थिती अत्यंत वाईट असून, त्या प्रवासी वाहतुकीसाठी अयोग्य बनल्या आहेत. हीच स्थिती पुणे विभागाची असून, ८५० बसेसपैकी ४०० बस प्रवासी वाहतुकीसाठी धोकादायक बनल्या आहेत. या बसेस राज्य परिवहन महामंडळाला भंगारात काढायच्या आहेत, मात्र त्या जागी दुसऱ्या बसेसची उपलब्धता नसल्याने धोकादायक स्थितीतील बसेसच्याच माध्यमातून वाहतूक सुरू आहे. यामुळे प्रवाशांच्या जीविताला धोका आहे.
एसटीच्या अपघाताचे प्रमाण जरी कमी असले तरीही ब्रेक डाऊनच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. त्याबरोबरच देखभाल दुरुस्तीचा खर्चदेखील वाढत आहे. एका बसचा प्रतिकिमी प्रवासासाठी मेंटेनन्सचा खर्च हा साडे चार रुपये आहे. वर्षाकाठी ६० हजार एसटी बस ब्रेकडाऊन होत आहेत. एसटी बसची स्थिती खराब झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. प्रवाशांचा वेळ वाया जाऊन गैरसोयदेखील होते. डेपोतून निघताना या बसची कधी पाहणी होते, तर कधी नाही. यापार्श्वभूमीवर धोकादायक बसेस प्रवासी सेवेतून हटविणे गरजेचे आहे.
खराब बसेस बदलण्यासाठी २ हजार डिझेलवरील बस खरेदीचा निर्णय झाला असून, त्याची टेंडर प्रक्रिया सुरू आहे. प्रवाशांना लवकर बसेस मिळाव्यात, यासाठी प्रयत्नशील आहोत.
- शेखर चन्ने, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, राज्य परिवहन महामंडळ, मुंबई
ज्या बस प्रवासी वाहतुकीसाठी अयोग्य आहेत, त्या तत्काळ सेवेतून बाहेर काढल्या पाहिजेत. यामुळे प्रवासी सुरक्षितता धोक्यात येण्याची शक्यता आहे. अशा बसवर देखभालीचा देखील खर्च जास्त होतो. त्यामुळे तत्काळ नवीन बसची खरेदी झाली पाहिजे.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस, मुंबई
ST महामंडळाचा पसारा
राज्यातील एकूण एसटी बस : १६ हजार
प्रवासासाठी अयोग्य बसेस : ७ हजार
दैनंदिन उत्पन्न : १४. ५० कोटी.
देखभालीवर वर्षाला होणारा खर्च: सुमारे २५० कोटी
राज्यातील ब्रेक डाऊनचे प्रमाण : वर्षात ५५ ते ६० हजार.