पुणे (Pune) : ‘‘आपल्याकडे महापालिकेचा विकास आराखडा तयार होतो. मात्र नगर विकास आराखडा तयार होत नाही. जोपर्यंत शहरांमध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या यंत्रणा एकत्र बसून काम करत नाही, तोपर्यंत शहराचा विकास होणे शक्य नाही,’’ असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. पुरामुळे नागरिकांचे झालेलं नुकसान सरकारने भरून दिलं पाहिजे. पुरस्थितीला कारणीभूत असणाऱ्या पाटबंधारे विभाग आणि पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे, असे खडे बोल ठाकरे यांनी सुनावले.
राज ठाकरे यांनी रविवारी सिंहगड रस्ता परिसरातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. एकतानगर आणि निंबजनगर येथील सोसायट्यांना भेट देत नागरिकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. यावेळी नागरिकांनी समस्यांचा पाढाच वाचला. निंबजनगर आणि एकतानगर या भागाला त्यांनी भेट दिली तसेच नदी पात्राच्या भागाची देखील पाहणी केली. नागरिकांना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. ठाकरे यांच्यासोबत शिवाजी मते, सोनाली पोकळे, साईनाथ बाबर, अजय शिंदे, बाळा शेडगे, राहुल वाळुंजकर, ॲड. सुनील कोरफडे, आकाश साळुंखे आणि गणेश सातपुते उपस्थित होते.
राज ठाकरे म्हणाले, ‘‘नदीपात्राची परिस्थिती अत्यंत खेदजनक आहे. नदीपात्रामध्ये राडारोडा टाकण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले. बांधकाम साहित्य, कचरा, राडारोडा टाकून नदीपात्र बुजविण्याचे काम सुरू असून युद्ध पातळीवर ही सर्व कामे थांबवून यावर कडक कारवाई करणे आवश्यक आहे. पाटबंधारे विभाग आणि पुणे महापालिकेचे अधिकारी या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करत आहेत.’’