सिद्धटेक (Siddhatek) : तीन वर्षांपूर्वी दिमाखात आगमन झालेली प्रवासी वाहतूक करणारी बोट आज अक्षरशः गाळात रूतून बसली आहे. लाखोंचा निधी खर्चून बोटीपासून उत्पन्न मात्र शून्य आहे. नैसर्गिक अनुकूलतेमुळे येथे विविध प्रकल्प राबवण्यासाठी मोठा वाव असला तरी पर्यटन धोरणातील व्यावसायिकता आणि नियोजनाअभावी अनेक वर्षांपासून येथे विविध योजनांवर करण्यात आलेला कोट्यवधींचा खर्च निरुपयोगी ठरत आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये जिल्हा आपत्कालीन निधीतून सुमारे ४० लक्ष निधी खर्चून यांत्रिक बोटीचे नियोजन करण्यात आले.
आमदार रोहित पवार यांनी बोटीचे लोकार्पण केले. ३० आसनक्षमता असणारी ही बोट उजनी फुगवट्याची सैर घडवून आणणारी असल्याने पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरणारी होती. परंतु व्यवस्थापनाअभावी आज ही बोट गाळात रुतून बसलेली आहे. आता ही बोट सुरू करण्यासाठीच अधिकचा खर्च करावा लागणार आहे.
आधी बंधारा बांधा
प्रकल्पग्रस्तांची शेती, मत्स्यपालन, नौकानयन यासारखे व्यवसाय सुरळीतपणे चालण्यासाठी योग्य क्षमतेचा बंधाऱ्याची गरज आहे. बंधाऱ्याशिवाय येथे कोणत्याही प्रकारची केलेली गुंतवणूक पाण्यात जाणारीच ठरेल.
काही तांत्रिक कारणांमुळे बोट सुरू झालेली नाही. लवकरच त्यासंदर्भात नियोजन केले जाईल.
- रोहित पवार, आमदार