पिंपरी (Pimpri) : ‘‘वाहतूक विभागाच्या परवानगीअभावी मोरवाडी पिंपरी येथील मेट्रो रॅम्पचे काम रखडले आहे. या कामासाठी एका लेनची वाहतूक बंद करावी लागेल. त्यामुळे अडथळे निर्माण होतील. वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, यासाठी या कामाला परवागनी देण्यात आलेली नाही. भविष्यात प्रवाशांची वर्दळ वाढल्यानंतर त्या कामाला अधिक गती दिली जाईल,’’ अशी माहिती मेट्रो प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
मेट्रोला शहरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. स्थानकातील प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्वारगेटपर्यंत मेट्रो वाढविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे निगडीपर्यंतदेखील मेट्रो विस्तारणार आहे. ही सर्व कामे पूर्ण होत असताना, पीसीएमसी स्थानकाजवळ असलेल्या अर्धवट कामांमुळे चौकाच्या विद्रुपीकरणात तसेच वाहतूक अडथळ्यात वाढ होत आहे. स्थानकाकडे जाण्यासाठी लिफ्ट, सरकते जिने यासह दोन ठिकाणी रॅम्प उभारले आहेत. एका बाजूला काम पूर्ण झालेले आहे. मात्र, दुसरीकडे अर्धवट बांधकाम आणि उभारलेले पिलर अडचणीचे ठरत आहे.
निगडीच्या दिशेने महापालिकेच्या समोरील बाजूस मोरवाडी चौकातील सिग्नलजवळील जागा ताब्यात घेऊन अर्धवट पिलर उभारले आहेत. येथे पादचारी पूल आणि जिन्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी वाहतूक शाखेची परवानगी आवश्यक आहे. ती न मिळाल्याने हे काम अपूर्ण आहे. हे काम सुरू केल्यास वाहतुकीचा खोळंबा होऊ शकतो. यासाठी सध्या या कामाला परवानगी देण्यात आलेली नाही. सध्या मोरवाडी चौकात असणाऱ्या पुढच्या बाजूच्या जिन्याकडे जाताना प्रवाशांना जीव मुठीत धरून चौक ओलांडून जावे लागते. त्या शिवाय रस्ता ओलांडून महापालिकेकडील बाजूस असणाऱ्या स्थानकाकडे जावे लागते.
हे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी होईल यासाठी आतापर्यंत याबाबत परवानगी मिळत नव्हती. वाहतूक पोलिसांकडे त्याबाबत परवानगी मागितली आहे. ती लवकरच मिळेल अशी अपेक्षा आहे. त्यानंतर येथील काम पूर्ण करण्यात येईल. यामुळे प्रवाशांना स्थानकापर्यंत पोहोचणे सोयीस्कर होईल. सध्या दुसरीकडे लिफ्टची सुविधा आहे. त्यामुळे फारशी अडचण येत नाही.
- हेमंत सोनवणे, जनसंपर्क अधिकारी, महामेट्रो पुणे