Pune Metro : 'या' प्रमुख मार्गासाठी चेन्नईतून मेट्रोचे डब्बे पुण्याकडे रवाना

Pune Metro
Pune MetroTendernama
Published on

पुणे (Pune) : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या तेवीस किलोमीटर लांबीच्या इलेव्हेटेड (उन्नत मार्ग) मेट्रोसाठी चेन्नई येथून तीन डब्बे रवाना झाले आहेत. या आठवड्यात ते पुण्यात दाखल होतील, त्यानंतर तपासणी करून त्यांची चाचणी घेण्यात येणार आहे.

Pune Metro
Pune Railway Station : पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांना मिळणार सुखद धक्का; लवकरच...

पुणे महानगराचा गतीने विकास करण्यासाठी पीएमआरडीएची स्थापना झाल्यानंतर पहिल्या वर्षातच हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तीन महिन्यात दिल्ली मेट्रोने हे सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण केले. तत्कालीन मुख्यमंत्री देव्रेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली २०१६ मध्ये झालेल्या मुंबई येथील बैठकीत प्रकल्प राबविण्यास मान्यता देण्यात आली. तर पीपीपी तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यास २०१८ मध्ये राज्य सरकारकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्षात नोव्हेंबर २०२१मध्ये कंत्राटदार कंपनीला काम सुरू करण्यास मान्यता दिली. प्रत्यक्षात १३ एप्रिल २०२२ मध्ये कामाला सुरूवात झाली. गेल्या दोन वर्षात मेट्रो प्रकल्पासाठीचे पिलर्स उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्याबरोबरच गर्डर टाकण्याचे काम साठ टक्के पूर्ण झाले आहे. तर विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे काम देखील वेगाने सुरू आहे.

Pune Metro
Pune News : पहिल्याच पावसाने का उडाली पुणेकरांची दाणादाण?

दरम्यान चेन्नई येथे मेट्रोसाठी डब्बे तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. मागील महिन्यात तेथे तपासणी देखील पूर्ण झाली असून पुण्यासाठी तेथून डब्बे रवाना झाले आहेत. पुण्यातील मेट्रो डेपोमध्ये या आठवड्यात डब्बे दाखल होणार आहेत. तेथे पुन्हा एकदा त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. ती पूर्ण झाल्यानंतर हिंजवडी ते बाणेर दरम्यान मेट्रोची चाचणी घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

अशी धावणार मेट्रो

सुमारे साडेतेवीस किलोमीटर लांबी हा मार्ग असणार आहे. या मार्गावर एकूण २३ स्टेशन असणार आहेत. तर हिंजवडी येथील एमआयडीसीच्या ५५ एकर जागेवर मेट्रोसाठी स्वतंत्र डेपो उभारण्यात आला आहे. हिंजवडी -मेघा पोलिस- विप्रो चौक, शिवाजी चौक, वाकड उड्डाणपूल, बालेवाडी स्टेडीयम- विद्यापीठ चौक, आकाशवाणी केंद्र, शिवाजीनगर न्यायालय असा मेट्रोचा मार्ग राहणार आहे. शिवाजीनगर येथे पुणे महापालिकेच्या मेट्रो प्रकल्पास मार्ग जोडण्यात येणार आहे. प्रत्येक हजार मीटरवर मेट्रोसाठी स्टेशन उभारण्यात येणार आहे. डब्बे दाखल झाल्यानंतर पाच किलोमीटरची पहिल्या टप्प्यात ट्रायल घेण्यात येणार आहे.

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट

-हिंजवडी ते शिवाजीनगर २३. ३ किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प

-संपूर्ण मार्ग इलेव्हेटेड असणार आहे.

-संपूर्ण प्रकल्प पीपीपी तत्त्वावर राबविणार

- प्रकल्पाचा खर्च आठ हजार ३१३ कोटी

-मार्गावर एकूण २३ स्टेशन असणार आहेत.

-शिवाजीनगर न्यायालयाच्या येथे पुणे महापालिकेच्या मेट्रो प्रकल्पास तो जोडण्यात येणार

-हिंजवडी येथील एमआयडीसीच्या ५५ एकर जागेवर मेट्रोसाठी डेपो

- पुणे विद्यापीठ येथे दुमजली उड्डाणपूल

-प्रकल्प पूर्णत्वाची मुदत एप्रिल २०२५

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com