पुणे (Pune) : उत्तरप्रदेशातील नोयडापासून चीनच्या वूहान प्रांतापर्यंतचे परीक्षा केंद्र देणारी महाराष्ट्रातील वादग्रस्त आरोग्य भरती अखेर रद्द करण्यात आली आहे. उमेदवारांच्या आठ महिन्यांच्या आक्रोशानंतर मविआ सरकारने अस्थिर काळात हा निर्णय घेतला. सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला.
छायाचित्र नसलेले प्रवेशपत्र, अस्तित्वात नसलेली परीक्षा केंद्रे, अल्पवयीन पर्यवेक्षक आणि फुटलेली प्रश्नपत्रिका यामुळे वादग्रस्त ठरलेल्या आरोग्य भरतीचे पोलिस तपासात धिंडवडेच निघाले. तरीही राज्य सरकारने मागील आठ महिने परीक्षेतील गैरव्यवहाराकडे दुर्लक्ष करत उमेदवारांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले होते. अखेरीस बुधवारी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अव्वर सचिव अर्चना वालझाडे यांनी यासंबंधीचे परिपत्रक जारी केले आहे. सर्व क्षेत्रीय कार्यालयांना यासंबंधीच्या सूचना दिल्या आहेत.
पुन्हा परीक्षा..
विभागांतर्गत गट ‘क’ व ‘ड’ ची २४ आणि ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात आलेली पदभरती परीक्षा रद्द करण्यास मान्यता दिल्याचे परिपत्रकात स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर नव्याने घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी जाहिरात देण्यात यावी. तसेच रद्द केलेल्या परीक्षेत अर्ज करणाऱ्या पात्र उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले आहे. नव्याने अर्ज करणाऱ्या उमेदवारांना नियमित शुल्क भरावे लागणार आहे.
हे प्रश्न अनुत्तरीत :
- वादग्रस्त कंपन्यांकडील डेटाच्या सुरक्षिततेचे काय होणार
- जिल्हा बदलला म्हणून अधिकचे प्रवेश शुल्काचे काय होणार
- नवीन परीक्षा पद्धत पारदर्शक असणार का
- वादग्रस्त कंपनीनेच लोहमार्ग पोलिस, ग्रामविकास विभाग आदींच्या परीक्षा घेतल्या, त्यांचे नक्की काय?