पुणे (Pune) : शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) कारभारावर टीकेची झोड उठल्यानंतर आता प्रशासनाला जाग आली असून, येत्या २० जानेवारीपर्यंत रस्ते पूर्ववत करण्याचे आदेश स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
खड्ड्यांमुळे आणि रेंगाळलेल्या कामामुळे वाहनचालकांचे कंबरडे मोडले असल्याने नागरिकांनी पुणे महापालिकेवर टीकेची झोड उठवली आहे. रासने यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन काम पूर्ण करण्यास आणखी किती वेळ द्यायचा. आता २० जानेवारी पर्यंत सर्व रस्ते पूर्ववत करा व पुढील तीन वर्ष रस्ते खोदायला मान्यता देऊ नका असे आदेश प्रशासनाला दिले.
गेल्या महिन्यात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सदाशिव पेठ, शनिवार पेठ, नारायण पेठ, शुक्रवार पेठेतील रस्ते खोदाईच्या कामाची पाहणी केली होती. त्यानंतर रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेतले व जेथे खोदकाम केले आहे तेथे सुरक्षेची काळजी घेतली गेली. पण गेल्या काही दिवसांपासून ठेकेदाराकडून नियमांची पायमल्ली करून काम सुरू आहेत. खड्ड्यांमुळे नागिरकांना मान, पाठीचा त्रास सुरू झाला, तर धुळीनेही नागरिक बेजार झाले आहेत. अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी, अधिक्षक अभियंता संतोष तांदळे, पाणीपुरवठा विभागाचे नंदकिशोर जगताप, क्षेत्रीय अधिकारी आशिष महादलकर, सांडपाणी विभागाचे विलास फड, उमेश गोडगे व स्मार्टसिटीचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
रासने म्हणाले, ‘‘गेल्या ४५ वर्षापासून या भागातील पाणीपुरवठा आणि सांडपाणी वाहिन्या बदलल्या नव्हत्या. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाजारपेठ बंद असताना हे काम हाती घेण्यात आले. तसेच याच काळात एमएनजीएल, इंटरनेट कंपन्यांनीही काम केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खोदाई झाल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. आता सर्व प्रमुख रस्ते पूर्ववत करण्यासाठी नियोजनबद्ध काम सुरू आहे. रस्ते खोदाईचे काम १० जानेवारी पर्यंत पूर्ण करावे त्यानंतर पुढील दहा दिवसांत प्रमुख सहा रस्त्यांचे डांबरीकरण करून रस्ते पुर्ववत करावेत. तसेच झेब्रा क्रॉसिंग, रस्त्यावर पट्टे मारणे व इतर सुशोभीकरण केले जाईल.
टिळक रस्त्यावर ३० जानेवारीपर्यंत काम
टिळक रस्त्यावर हिराबाग चौक ते स्वारगेट या रस्त्यावर समान पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. हे काम ३० जानेवारी पर्यंत करण्याची मुदत पाणी पुरवठा विभागाला दिले आहे. उर्वरित सर्व कामे २० जानेवारी पर्यंत पूर्ण होतील.
पुन्हा एकदा पादचारी दिन
लक्ष्मी रस्त्यावर ४०० मिटरचा पादचारी दिन साजरा केल्यानंतर आता बेलबाग चौकापासून पादचारी ते विजय टॉकिजपर्यंत २६ जानेवारी रोजी पादचारी दिन साजरा केला जाईल. यामध्ये मंडईतील टिळक पुतळा, महात्मा फुले मंडई, तुळशीबाग, शनिपार, नगरकर तालीम या भागाचाही समावेश असेल, असे रासने यांनी सांगितले.