Pune : मुळा, मुठा व राम नद्यांच्या पात्रात राडारोडा टाकून नदीपात्र बुजविण्याचे सत्र सुरुच, कारण...

Pune
PuneTendernama
Published on

पुणे (Pune) : मुळा, मुठा व राम नद्यांच्या पात्रात ठिकठिकाणी राडारोडा टाकला जात असूनही महापालिका प्रशासनाला त्यावर नियंत्रण आणणे शक्‍य झालेले नाही. राडारोडा व्यवसायाच्या तुलनेत दंडाची रक्कम किरकोळ असल्याने नदीपात्र बुजविण्याचे सत्र सुरूच आहे. किरकोळ दंडात्मक कारवाईमुळे राडारोडा टाकणाऱ्यांवर प्रशासनाचा धाक निर्माण होणार कधी, असा प्रश्‍न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Pune
होऊ दे खर्च!; महायुती सरकारची जाहिरातबाजीवर कोटीच्या कोट्टी उड्डाणे

मोठ्या बांधकाम व्यावसायिक कंपन्यांकडून त्यांच्या प्रकल्पात निघणारा राडारोडा जिरविण्यासाठी महापालिकेच्या प्रकल्पाकडे दिला जातो. मात्र, छोटे बांधकाम प्रकल्प, पुनर्विकास प्रकल्पाच्या ठिकाणी निघणारा राडारोडा नदीपात्रासह सार्वजनिक ठिकाणी टाकला जातो. राडारोड्याची विल्हेवाट लावण्यासाठी येणारा खर्च वाचविण्यासाठी नदीपात्रासारखी ठिकाणे निवडली जात आहेत. मुठा, मुळा व राम या तीन नद्यांच्या काठावर राडारोडा टाकला जात आहे. खडकवासला ते मुंढवा जॅकवेलपर्यंतच्या परिसरातील शिवणे, उत्तमनगर, वारजे, कोंढवे धावडे, कर्वेनगर, नांदेड, वडगाव, डेक्कन, मंगळवार पेठ, संगमवाडी, स्मशानभूमी ते मुंढवा पूल, खराडी जॅकवेल अशा ठिकाणी अजूनही राडारोडा टाकला जात आहे. महापालिका प्रशासन व नागरिकांना हा प्रकार कळू नये, यासाठी रात्रीच्या वेळी राडारोडा टाकला जात असल्याची सद्यःस्थिती आहे.

Pune
Pune : 'निमगाव खंडोबा' परिसरात रोप-वे, पर्यटन सुविधांचा मार्ग मोकळा; 24 एकर जमीन हस्तांतरित

महापालिका प्रशासनाने कर्वेनगर येथे नदीपात्रातील राडारोडा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून राडारोडा काढण्यास भाग पाडले. संबंधित व्यावसायिकाकडून साडेसात लाख रुपयांचा दंडही आकारण्यात आला. पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात दंड आकारण्याची कारवाई झाली. मात्र, इतरवेळी राडारोडा टाकणाऱ्यांकडून केवळ एक ते आठ हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जातो. हा दंड वसूल करतानाही महापालिका प्रशासनाची दमछाक होते. दंडाची रक्कम किरकोळ असल्याने राडारोडा टाकण्याचे सत्र अजूनही कायम आहे. दंडाच्या रकमेत वाढ केल्यास काही प्रमाणात जरब बसण्याची शक्‍यता आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून ऑक्‍टोबर २०२३ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीमध्ये राडारोडा टाकणाऱ्या ५२७ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २३ लाख ७२ हजार ६५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दंडाची रक्कम व कारवाई प्रत्यक्षात दिसते, मात्र संबंधितांवर अजूनही महापालिकेचा धाक बसत नसल्याची सद्यःस्थिती आहे.

नदीपात्रात राडारोडा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. दंडाची रक्कम कमी आहे, मात्र कारवाई केली जाते. दंड वसूल करताना अनेकदा अडचण येते. तरीही, प्रशासनाकडून राडारोडा टाकणाऱ्यांवर यापुढेही कडक कारवाई केली जाईल.

- संदीप कदम, प्रमुख, घनकचरा व्यवस्थापन विभाग, महापालिका

नदीपात्रामध्ये ठिकठिकाणी राडारोडा टाकला जातो. मात्र, कारवाई कमी प्रमाणात होते. संगमवाडी परिसरासह अनेक ठिकाणी राडारोडा टाकून नदीपात्र बुजविले जात आहे.

- समीर निकम, अध्यक्ष, क्लीन रिव्हर सोसायटी

ऑक्‍टोबर २०२३ ते सप्टेंबर २०२४ दरम्यान एकूण कारवाया - ५२७

२०२३मधील दंडाची एकूण रक्कम

ऑक्‍टोबर - १ लाख ३२ हजार

नोव्हेंबर - १ लाख २२ हजार ६५०

डिसेंबर - ३ लाख ४६ हजार

२०२४मधील दंडाची एकूण रक्कम

जानेवारी - ७० हजार ७५०

फेब्रुवारी - ३ लाख ५७ हजार

मार्च - २ लाख १६ हजार ७५०

एप्रिल - १ लाख ३८ हजार ७५०

मे - १ लाख ५४ हजार ५००

जून - २ लाख ५२ हजार

जुलै - २ लाख ३८ हजार ५००

ऑगस्ट - १ लाख ४६ हजार ५००

सप्टेंबर - १ लाख ९७ हजार २५०

एकूण - २३ लाख ७२ हजार ६५०

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com