पुणे (Pune) : पुणे विमानतळावर (Pune Airport) वाढणारी गर्दी आणि असुविधांमुळे प्रवासी चांगलेच त्रस्त झाले आहेत. विमानतळाजवळ पोहोचण्यासाठी आधी वाहनांच्या रांगा अन् नंतर विविध सोपस्कार पार पाडण्यासाठी प्रवाशांच्या रांगा. त्यात पुन्हा विमानांना उशीर होणे, रद्द होणे हे प्रकार ठरलेले. प्रवासी संख्येचा विचार केल्यास पुणे विमानतळ आता लहान पडत आहे. जागेअभावी सुविधाही अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. मात्र, पर्याय नसल्याने अजूनही काही प्रवासी पुणे विमानतळावरून प्रवास करतात तर काही प्रवासी मुंबई (Mumbai) किंवा जवळची शहरे गाठत आहेत.
टर्मिनलच्या क्षमतेपेक्षा जास्तीचे प्रवासी सध्या पुणे विमानतळावरून प्रवास करीत आहेत. त्यामुळे प्रवेशापासून ते सिक्युरिटी चेक इनपर्यंत त्यांना रांगेत थांबावे लागते. त्यासाठी एक ते दीड तास लागतो. प्रवाशांना बसण्यासाठी आरामदायी खुर्च्या नाहीत. त्यांना स्टीलच्या बाकड्यांवरच बसावे लागते. पर्याप्त विश्रांती कक्षाचा अभाव, बॅगेज बेल्ट कमी अन् पुरेशी जागा नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे राजेश कुलकर्णी यांनी सांगितले.
प्रवासी का कंटाळले?
१. पुणे विमानतळावर पोचण्यासाठीच वाहतूक कोंडीतून वाट काढत जावे लागते. रात्रीच्या वेळी विमानांची संख्या जास्त आहे. त्यामुळे प्रवाशांना सोडण्यासाठी येणाऱ्या वाहनांची संख्या जास्त असते. परिणामी, विमानतळासमोर वाहतूक कोंडी होते. त्यात बराच वेळ जातो.
२. दोन तास अगोदर येऊनही रांगेत उभे राहावे लागते.
३. ज्या प्रवाशांचे कनेक्टिंग विमान असते, त्यांना विश्रांतीसाठी शॉर्ट ओव्हरची सुविधा नाही.
४. रिशेड्यूल झालेल्या प्रवाशांना थांबण्यासाठी विशेष सोय नाही.
५. स्टीलच्या बाकड्यांवर बसूनच प्रतीक्षा करावी लागते.
विश्रांती कक्ष का नाही?
अनेक प्रवासी कनेक्टिंग विमानाने आपला पुढचा प्रवास करतात. अशा प्रवाशांसाठी अथवा ज्या प्रवाशांच्या विमानांना उशीर होतो, अशा प्रवाशांसाठी विमानतळावर शॉर्ट लेओव्हर (विश्रांती कक्ष) असणे गरजेचे आहे. येथे प्रवाशांना विश्रांती घेता येते. मात्र, ही सुविधा पुणे विमानतळावर नाही. त्यामुळे प्रवासी विमानतळावर तिष्ठत बसतात.
गर्दीचे नियोजन सुरू आहे. आज दुपारी ‘चेक इन’च्या सर्व्हरमध्ये बिघाड झाला. मात्र, त्यावेळी थेट प्रवाशांची तपासणी केली जात आहे.
- संतोष ढोके, विमानतळ संचालक
विंटर शेड्यूलमध्ये प्रवाशांची गर्दी वाढणार, याचा विमानतळ प्रशासनाला अंदाज होता. तेव्हा आधीपासूनच गर्दीचे नियोजन होणे गरजेचे होते. प्रवाशांना असुविधेला तोंड द्यावे लागणे, ही निषेधार्ह बाब आहे. विमानतळ प्रशासनाने याची जबाबदारी घेतली पाहिजे.
- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ, पुणे विमानतळ