पुणे (Pune) : पूर्व पुणे आणि पश्चिम पुण्याला जोडण्यासाठी मुळा-मुठा नदीवर (Mula - Mutha River) अनेक पूल आहेत. शहरातील महत्त्वाच्या चौकांमधील कोंडी कमी करण्यासाठी उड्डाणपूल (Flyover) बांधले आहेत. पण हे पूल, उड्डाणपूल सुरक्षीत आहेत का?, याची तपासणी महापालिकेच्या (PMC) प्रकल्प विभागातर्फे केले जात आहे. ४४ पैकी ३५ पुलांचे काम पूर्ण झाले आहेत. या तपासणीचा अहवाल मार्च महिन्यात मिळणार असून, त्यामुळे शहरातील पुलांची नेमकी स्थिती काय आहे, हे समोर येणार आहे.
पुणे शहरात मुळा-मुठा नदीवर ब्रिटिशकालीन पूल आहेत. यामध्ये मुठा नदीवर छत्रपती संभाजी पूल (लकडी पूल), छत्रपती शिवाजी पूल (नवा पूल), जुना संगम पूल, वेलस्ली पूल, बंडगार्डन पूल, जुना हॅरिस पूल यांचा समावेश आहे. हे सगळे पूल १०० वर्षांपेक्षा जास्त जुने आहेत. स्वातंत्र्यानंतर पुणे महापालिकेने शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पूल बांधले असून, त्यात २६ पुलांचा समावेश आहे. १८ उड्डाणपूल बांधलेले आहेत.
मुळा आणि मुठा नदीच्या दोन्ही बाजूने पुण्याचा मोठा विकास झाला आहे, त्यामुळे शहरातील वाहतूक सुरळीत करण्यास या पुलांचे महत्त्व आहे. भविष्यात होणारा वाहतुकीचा प्रश्न लक्षात घेता, या दोन्ही नद्यांवर आणखी काही पूल प्रस्तावित आहेत.
हडपसर पुलाला १५ वर्षांत तडे
हडपसर येथे एमएसआरडीसीकडून बांधलेल्या पुलाला केवळ १५ वर्षांतच तडे गेल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. त्यासाठी हा पूल बंद ठेवून दुरुस्ती करण्यात आली होती. त्यामुळे सोलापूर महामार्ग, सासवड रस्ता या भागातील वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
दरम्यान महापालिकेने केलेले हे काम योग्य आहे की नाही?, हे तपासणीसाठी गेल्या आठवड्यातही हडपसर पूल दोन दिवस वाहतुकीसाठी बंद होता. त्यामध्ये उड्डाणपुलाचे काम व्यवस्थित झाल्याचे समोर आले आहे.
१० वर्षांपेक्षा जुन्या पुलांची तपासणी
महापालिकेने १० वर्षांपेक्षा जास्त जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचा निर्णय घेतला. सध्या शहरात ५९ पैकी ४४ पूल हे १० वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून वापरात आहेत. त्यामध्ये २६ नदीवरील पूल आणि १८ रस्त्यावरील उड्डाणपूल आहेत.
ब्रिटिशकालीन दगडी पूल आणि नव्याने बांधलेले सिमेंट काँक्रिटच्या पुलांची तपासणी वेगळ्या पद्धतीने केली जाते. त्यासाठी ८ ते १० चाचण्या करून पूल मजबूत आहे की नाही?, याची तपासले जाते. या कामांसाठी ९० लाख रुपयांचा खर्च होणार आहे.
या चाचण्या केल्या जातात
नदीवरील पूल असो किंवा उड्डाणपुलांची तपासणी करण्यासाठी लोड टेस्ट, कोअर टेस्ट, रिबाऊंड हॅमर टेस्ट, बेअरिंग टेस्ट, एक्सपांशन ज्वाइंट टेस्ट यासह ८ ते १० तपासण्या केल्या जातात.
पुण्यातील १० वर्षांपेक्षा जास्त जुने पूल आणि उड्डाणपुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट केले जात आहे. बहुतांश पुलांचे काम संपले असून, मार्च महिन्यात त्याचा अहवाल मिळेल. त्यानुसार ज्या ठिकाणी दुरुस्ती आवश्यक आहे, त्या केल्या जातील.
- अभिजित आंबेकर, कार्यकारी अभियंता, प्रकल्प विभाग