पुणे (Pune) : 2014 मध्ये जगातील सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताची अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावर होती. मागील दशकभरात भारतीय अर्थव्यवस्थेने तब्बल 40 टक्क्यांची मोठी भरारी घेतली आहे. कोरोना संकटाच्या काळातही भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी चांगली राहिली आहे. 2047 मध्ये भारताची अर्थव्यवस्था जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असेल, असा दावा केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केला आहे.
मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यात येत असलेल्या पायाभूत सुविधांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा बूस्ट मिळणार असून, त्यामुळे अर्थव्यवस्था वेगाने वाढणार आहे, असेही शिंदे म्हणाले. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या इंडिया फाउंडेशन या थिंक टॅंकतर्फे आयोजित वार्षिक परिषदेत शिंदे बोलत होते.
पायाभूत क्षेत्रांतील विकास हा अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरणार आहे. 2047 पर्यंत देशात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण झालेल्या असतील. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर सरकारचा भर आहे. कारण चांगल्या पायाभूत सुविधांचा थेट परिणाम उत्पादन क्षेत्रावर होताना दिसतो. चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण झाल्यानंतर लॉजिस्टिकसाठीच्या खर्चात ही मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते. एकूणच यामुळे अर्थव्यवस्थेला बळ मिळणार आहे, असा दावा शिंदे यांनी केला.