मुंबई (Mumbai) : जून महिन्याच्या सुरुवातीपासून आर्थिक बाबींशी निगडीत काही नवे नियम लागू होणार आहेत. हे नियम माहित असणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे. वाहन मालक, स्टेट बँकेचे गृहकर्जदार, ऍक्सिस बँक आणि पोस्ट पेमेंट बँकेचे ग्राहक यांना या नियमांचा परिणाम तीव्रतेने जाणवणार आहेत.
वाहनांचा थर्ड पार्टी विमा महागणार
एक जूनपासून दुचाकी, चारचाकी वाहनांचा थर्ड पार्टी विमा महागणार आहे. १००० सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या खासगी मोटारींसाठी विमा हप्ता २०१९-२० मधील २०७२ रुपयांवरून २०९४ रुपये तर १५०० सीसी इंजिन क्षमतेसाठी तो आता ३४१६ रुपये करण्यात आला आहे. १५०० सीसीपेक्षा अधिक क्षमतेच्या मोठ्या वाहनांसाठी विमा हप्ता ७८९० रुपये झाला आहे. १००० सीसी क्षमतेच्या नवीन मोटारीसाठी तीन वर्षांसाठीचा हप्ता ६५२१ रुपये असेल. दुचाकींच्या बाबतीत, १५० सीसी ते ३५० सीसी दरम्यानच्या वाहनांसाठी विमा हप्ता १३६६ रुपये असेल, तर ३५० सीसीपेक्षा अधिक क्षमतेच्या वाहनांसाठी तो २८०४ रुपये असेल. नवीन दुचाकींसाठीच्या विमा हप्त्यातही वाढ झाली आहे. इलेक्ट्रीक वाहनांच्या विमा हप्त्यातही वाढ करण्यात आली आहे.
स्टेट बँकेचे गृहकर्ज महाग :
स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या गृहकर्जाच्या एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेटमध्ये ४० आधारभूत अंकांनी वाढ करून तो ६.६५ टक्क्यांवरून ७.०५ टक्के केला आहे. तर रेपो निगडीत कर्ज व्याजदर ६.२५ टक्क्यांवरून ६.६५ टक्के केला आहे. या आधी १५ मे पासूनच बँकेने नवीन एमसीएलआर दर लागू केले आहेत. त्यामुळे एक जूनपासून स्टेट बँकेच्या गृहकर्जदारांना खिशाला अधिक कात्री लागणार आहे.
अॅक्सिस बँकेच्या बचत खाते नियमांमध्ये बदल
अॅक्सिस बँकेनेएक जूनपासून बचत खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची मर्यादा वाढवली आहे. निमशहरी आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना आता १५ हजार रुपयांऐवजी २५ हजार रुपये किमान शिल्लक किंवा एक लाख रुपयांची मुदत ठेव ठेवावी ठेवावी लागणार आहे. बचत खात्यावरील सेवा शुल्कातही वाढ करण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत व्यवहार शुल्क
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने आधार निगडित पेमेंट सिस्टीमसाठीच्या शुल्कात वाढ केली आहे. १५ जूनपासून रोख व्यवहार शुल्क आकारण्यात येणार आहे. नवीन नियमांनुसार, प्रत्येक महिन्यात तीन वेळा पैसे काढण्याचे व्यवहार मोफत असतील. रोख रक्कम भरणे,प्रत्येक महिन्याला मिनी स्टेटमेंट घेणे यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. विनामूल्य व्यवहारानंतर प्रत्येक रोख पैसे काढणे किंवा ठेवण्याच्या व्यवहारांवर प्रत्येकी २० रुपये अधिक जीएसटी लागू होईल, तर मिनी स्टेटमेंट व्यवहारावर ५ रुपये अधिक जीएसटी असे शुल्क लागू होईल.
हॉलमार्किंगचा दुसरा टप्पा सुरू :
सोन्याच्या हॉलमार्किंगचा दुसरा टप्पा जूनपासून सुरू होणार आहे. आता २५६ जिल्ह्यांव्यतिरिक्त ३२ नवीन जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग केंद्रे उघडण्यात येणार आहेत. या सर्व २८८ जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग बंधनकारक होणार आहे. आता या जिल्ह्यांमध्ये १४, १८,२०,२२,२३ आणि २४ कॅरेटचे हॉलमार्किंग असलेलेच दागिने विक्री करता येणार आहेत. एक जूनपासून ग्राहकाला प्रत्येक सोन्याच्या दागिन्यावर हॉलमार्किंग शुल्क म्हणून ३५ रुपये द्यावे लागणार आहेत.
पाच महत्त्वाचे बदल
वाहनांचा थर्ड पार्टी विमा महागणार
स्टेट बँकेचे गृहकर्ज महाग
अॅक्सिस बँकेच्या बचत खाते नियमांमध्ये बदल
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत शुल्क वाढ
हॉलमार्किंगचा दुसरा टप्पा सुरू