पुणे (Pune) : ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन असलेल्या 'लालपरी'ने आता कात टाकली आहे. नव्या चित्तवेधक, आकर्षक रुपातील दोन हजार नव्या कोऱ्या एसटी बसेस (New ST Buses) आधुनिक सुविधांसह महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे (MSRTC) आगामी वर्षात प्रवाशांच्या सेवेसाठी रुजू होणार आहेत. जानेवारी महिन्यात रस्त्यावरील प्रवासाचा शुभारंभ होऊन एप्रिल महिन्याच्या अखेरीस सर्व बसेस रस्त्यावर येतील.
कोरोनाची खडतर दोन वर्षे आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांचा संप यामुळे आर्थिकदृष्ट्या आजारी पडलेल्या एसटीला या खाईतून बाहेर काढण्यासाठी काही महत्त्वपूर्ण व क्रांतिकारी बदल हाती घेतले असून, त्यातूनच पहिल्या टप्प्यात एसटी बसचा लूक बदलण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांत तिचे स्वरूप काहीसे बदलले असेल, पण मूळ लाल रंगाची ओळख तशीच ठेवली आहे.
पहिल्या टप्प्यातील सातशे बसेसची बांधणी पुण्याच्या दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेसह, औरंगाबाद व नागपूरच्या कार्यशाळेत युद्ध पातळीवर सुरू आहे. दापोडीच्या कार्यशाळेत तयार झालेल्या २५० वर बसेसच्या पासिंगसह परिवहन विभागाच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या असल्याची माहिती, एसटीच्या दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेचे व्यवस्थापक द. गो. चिकोर्डे यांनी दिली.
एप्रिल महिन्यापर्यंत सातशे बसेसच्या बांधणीचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर उर्वरित एक हजार तीनशे बसेसची बांधणीही लगेचच हाती घेतली जाणार आहे. नवीन वर्षात या सर्व नव्या बस रस्त्यावर धावतील असे एसटी महामंडळाचे नियोजन आहे. दापोडीच्या कार्यशाळेत सद्यःस्थितीत महिन्याला साठ बसेसची बांधणी होत असून, महामंडळाने ठरविलेले ध्येय गाठण्यासाठी कार्यशाळा कर्मचारी वेगाने काम करीत आहेत. बांधणीदरम्यान, लक्षात येणाऱ्या सुधारणा करण्यावर भर दिला जात आहे.
- द. गो. चिकोर्डे, व्यवस्थापक, एसटी मध्यवर्ती कार्यशाळा, दापोडी
अभिरुचीसंपन्न तरुण पिढी, माहिती-तंत्रज्ञानाच्या जमान्यातील टेक्नोसॅव्ही झालेला नवा प्रवासी वर्ग, तसेच आरामगाड्यांकडे (लक्झरी बस) प्रवाशांची ओढ कमी व्हावी, या पार्श्वभूमीवर, राज्याच्या कानाकोपऱ्यात अखंडपणे सेवा देणाऱ्या एसटीने आता नखशिखांत बदलायचे ठरविले आहे. या बदलातून आणि नव्या रंगरुपातून एसटीचे तोट्याच्या गर्तेत रुतलेले चाक बाहेर काढायचाही निर्धार महामंडळाने केला आहे.
एसटीच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या दोन हजार बसेस या सर्वसाधारण (साध्या) प्रकारातील असल्या तरी दोन बाय दोनच्या आसनव्यवस्थेमुळे प्रवास आणखी सुलभ होणार आहे. या गाड्यांच्या बांधणीदरम्यान, एसटीचे महाव्यवस्थापक शेखर चन्ने यांनी भेट देऊन यापुढील बसेसमध्ये बकेट टाइप पुश बॅक सिट्स बसविण्याची सूचना केल्याने आराम गाड्यांना असतात, तसे सिट्स यापुढील बांधणीत बसविले जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना साध्या एसटीच्या दरात आरामबस सारखा प्रवास करता येणार आहे.
नव्या एसटी बसची वैशिष्ट्ये
१. रंग : लाल (टोमॅटो रेड)
२. आसन व्यवस्था : २ बाय २
३. उंची : तीन हजार १२० एमएम
४. लांबी : ११ मीटर
५. व्हील बेस : पाच हजार सातशे एमएम
अशी आहे नवी बस...
१. 'पब्लिक अनाऊन्सिंग सिस्टीम'
२. 'मोबाईल चार्जिंग' सुविधा उपलब्ध
३. पूर्वीच्या बसपेक्षा उंची काहीशी कमी
४. २ बाय २ ची आरामदायी आसनव्यवस्था
५. उभे राहणाऱ्यांसाठी पीएमटी बसच्या धर्तीवर हॅंडल
६. प्रवाशांना मान टेकविण्यासाठी मऊ फोमची गादी
७. चालकाला वाहनांचा अंदाज येण्यासाठी खालील बाजूलाही आरसा
८. बस मागे घेण्यासाठी, अंदाजासाठी 'रिव्हर्स पार्किंग सेंसर'