पुणे (Pune) : परिवहन विभागाने (RTO) वेगाने धावणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे आता अपघाताच्या (Accidents) प्रमाणात घट झालेली दिसून येत आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (Mumbai Pune Expressway) वेगाने धावणाऱ्या वाहनांवर सर्वात जास्त कारवाई झाली आहे.
अवघ्या तीन महिन्यांत ‘आरटीओ’ने सुमारे २३ हजार वाहनांवर कारवाई केली आहे. यात निर्धारित वेगापेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणाऱ्या सुमारे पाच हजार वाहनांवर कारवाई झाली आहे. तर लेन कट करणाऱ्या सुमारे चार हजार वाहनांवर कारवाई करण्यात आली. परिणामी अपघाताचे प्रमाण सुमारे ३३ टक्क्यांनी घटले आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन विभाग वेगवेगळ्या स्तरांवर काम करीत आहे. गेल्या तीन महिन्यांपासूनच पुणेसह रायगड, पिंपरी-चिंचवड आरटीओच्या वायुवेग पथकाने २४ तास कारवाई केली आहे. त्याचा परिणाम आता दिसून येत आहे. डिसेंबर २२ ते फेबुवारी २३ दरम्यान अपघाताचे प्रमाण ३३ टक्क्यांनी घटले आहे. हे प्रमाण आणखी कमी करण्यासाठी परिवहन विभाग प्रयत्नशील आहे.
अपघातांचे प्रमाण घटले
अपघाताचे प्रकार : जानेवारी व फेब्रुवारी २२ : जानेवारी व फेब्रुवारी २३ : व्यक्ती (२२) : व्यक्ती (२३)
प्राणांतिक : २१ : १४ : १६ : ७
गंभीर जखमी : १६ : १३ : २२ : १२
किरकोळ जखमी : ०७ : ०३ : ० : ०
एकूण : ४४ : ३० : ३८ : १९
काय आहेत कारणे
(कारवाईमुळे मोटार वाहन कायद्यानुसार वाहन चालवायला सुरवात)
- निर्धारित वेगाइतके वाहन चालविणे.
- लेन कटिंग न करणे.
- वाहन चालविताना सीट बेल्ट वापरणे.
- वेगाबद्दल चालकांचे होणारे समुपदेशन.
या गुन्ह्यात झाली कारवाई -
अति वेगाने वाहने चालविणे : ५०१८
लेन कटिंग : ३९११
सीटबेल्ट न वापरणे : ३९५१
चुकीच्या ठिकाणी पार्किंग करणे : १४८६
वाहन चालविताना मोबाईलचा वापर : ६११
वाहन चालविताना परवाना न बाळगणे : ६६६
विमा नसलेली वाहने : ६८८
परमीट नसलेले वाहने : २१६
प्रवासी वाहतुकीतून मालाची वाहतूक : १९९
अन्य कारणे : ५९९९
एकूण : २२७४५
द्रुतगती मार्गावर अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, या करिता विविध उपाययोजना आखल्या जात आहे. सर्वात आधी अति वेगाने धावणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यावर भर दिला. यासह लेन कटिंग करणारी वाहने, सीटबेल्ट न लावलेल्या वाहनांवर कारवाई केली आहे.
- भारत कळसकर, परिवहन उपायुक्त, मुंबई