पुणे (Pune) : पुणे महापालिकेने (PMC) पहिल्या टप्प्यात ४४८ जागांची भरती पूर्ण केल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात ११ पदांसाठी ३४० जागांची भरती (Recruitment) प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये अग्निशामक दलासाठी २०० जागा, निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची २० जागा, आरोग्य निरीक्षक ४० यासह इतर विभागातील पदांचा समावेश आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी हा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवला आहे.
राज्य सरकारने भरती प्रक्रियेवरील स्थगिती उठविल्यानंतर महापालिकेने मागील वर्षी कनिष्ठ अभियंता, अतिक्रमण निरीक्षक, लिपिक पदाच्या तब्बल ४४८ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली होती. आयबीपीएस संस्थेकडून ऑनलाइन परीक्षा पारदर्शकपणे पार पाडली, त्यानंतर कागदपत्रांची छाननी करून पात्र उमेदवारांना महापालिकेच्या सेवेत घेतले आहे. ही पद्धतीने ही भरती प्रक्रिया पार पडल्यानंतर आता आणखी ११ पदांची भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
यामध्ये अग्निशामक दल आणि आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी रोस्टर तपासणी करून ३४० जागांच्या भरतीसाठीचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी महापालिका आयुक्तांकडे दिला होता. आयुक्तांनी त्यास मान्यता दिल्यानंतर भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवला आहे. या प्रस्तावानुसार आयबीपीएस या कंपनीकडेच भरतीची जबाबदारी दिली जाणार आहे.
या पदांची होणार भरती (जागांची संख्या)
अग्निशामक दल, फायरमन (२००), क्ष किरण तज्ज्ञ (८), वैद्यकीय अधिकारी (२०), उपसंचालक, प्राणी संग्रहालय (१), पशू वैद्यकीय अधिकारी (२), वरिष्ठ आरोग्य निरीक्षक (२०), कनिष्ठ अभियंता, विद्युत (१०), आरोग्य निरीक्षक (४०), वाहन निरीक्षक (३), औषध निर्माता (१५), पशुधन पर्यवेक्षक (१).