पुणे (Pune) : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्यात असताना राज्य सरकारने २१३ किलोमीटर लांबीच्या पुणे-नाशिक ग्रीन कॉरिडॉर (द्रुतगती मार्ग) प्रकल्पाच्या आखणीस मान्यता दिली आहे. त्यामुळे हायस्पीड रेल्वे आणि ग्रीन कॉरिडॉर एकत्र होणार की स्वतंत्र? किंवा एका प्रकल्पावर गंडांतर येणार, यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने ‘व्हीजन २०२०’ तयार केले आहे. त्यामध्ये पुणे-नाशिकदरम्यान सेमी हायस्पीड द्रुतगती रेल्वेमार्ग बांधण्याचे नियोजित आहे. या मार्गाची आखणी पूर्ण झाली असून केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारने त्यास मान्यता दिली आहे. अंतिम मान्यतेचा प्रस्ताव केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे. असे असतानाच पुणे ते नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाचा तांत्रिक व वित्तीय सुसाध्यता अहवाल तयार करण्याचे निर्देश मध्यंतरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसीला) दिले होते. त्यावरून वाद निर्माण झाला होता. तेव्हा महारेल्वेच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत फडणवीस यांनी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला गती देणार असल्याचे जाहीर केल्यानंतर या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
दरम्यानच्या कालावधीत पुणे-नाशिक ग्रीन कॉरिडॉरसंदर्भात एमएसआरडीसीने सल्लागाराची नियुक्ती करून या मार्गाची नव्याने आखणी पूर्ण केली. त्यामुळे एकावेळी रेल्वे आणि औद्योगिक मार्ग असे दोन पातळ्यांवर काम सुरू होते. सल्लागार कंपनीकडून अहवाल मिळाल्यानंतर रेल्वे मार्ग आणि ग्रीन कॉरिडॉर हे दोन्ही एकाच ठिकाणी होणार की स्वतंत्रपणे राबविले जाणार अथवा हायस्पीड रेल्वेला ब्रेक लागणार हे स्पष्ट होणार असल्याचे बोलले जात आहे. आज मात्र राज्य सरकारने पुणे-नाशिक ग्रीन कॉरिडॉरच्या आखणीस मान्यता दिली. त्याबाबतचा आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाचे अवर सचिव गिरीबुवा यांनी काढले आहेत.
कसा आहे प्रकल्प
२१३ कि.मी. लांबी
- पुणे-नाशिक कॉरिडॉर
२१,१५८ कोटी रुपये
- अपेक्षित खर्च
दोन हजार हेक्टर
- जमीन संपादन
पुणे, अहमदनगर व नाशिक
- या जिल्ह्यांतून जाणार
राजगुरुनगर, चाकण, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, घारगाव, संगमनेर आणि सिन्नर
- जोडणारी शहरे
दोन ते अडीच तासांत
- पुणे-नाशिक प्रवास
लघु, मध्यम व अवजड उद्योग कारखाने, कृषी-विषयक संस्था
- कोणाला फायदा
प्रकल्पाची आवश्यकता
पुणे शहर हे माहिती-तंत्रज्ञान, औद्योगिक व सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते तर नाशिक ही कृषी मालाची बाजारपेठ आहे. अलीकडच्या काळात नाशिक शहरामध्येही मोठ्या प्रमाणात आयटी कंपन्यांची स्थापना झाली आहे. या दोन्ही शहरांमध्ये लघु, मध्यम व अवजड उद्योग कारखाने, कृषी-विषयक संस्थांचे जाळे मोठ्या प्रमाणात आहे. या सर्व बाबींचा विचार करून आणि समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून पुण्याला जोडण्यासाठी हा ग्रीन कॉरिडॉर
प्रस्तावित केल्याचे ‘एमएसआरडीसी’ने सांगितले.