पुणे (Pune) : पुणे शहरातील सिग्नल यंत्रणा सुधारण्यासाठी ‘एटीएमएस’ (ATMS) प्रणाली असलेली सिग्नल यंत्रणा ८५ चौकात बसविण्यात आली आहे. तर पुढील दोन आठवड्यात सर्व १२५ चौकात ही यंत्रणा सुरू होईल. यामध्ये रस्त्यावरील वाहतूक किती आहे, यावरून सिग्नल किती सेकंदाचा असणार हे निश्चित होणार आहे. गर्दीच्या वेळी सिग्नल मोठा असेल, तर गर्दी नसताना नागरिकांना सिग्नलवर जास्त वेळ थांबावे लागणार नाही.
महापालिकेने स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ‘एटीएमएस’ यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाचे काम स्मार्टसिटीकडून होत असले तरी त्यासाठी महापालिकेने निधी उपलब्ध करून दिला आहे. गेल्या वर्षीपासून या प्रकल्पाचे काम सुरू झाले होते.
बहुतांश चौकात नवे सिग्नल बसून झाले आहेत. त्यापैकी ८५ सिग्नल सुरू झाले आहेत. तर उर्वरित सिग्नल दोन आठवड्यात सुरू होतील. त्यामुळे शहरातील वाहतूक नियोजन करणे सोपे होणार आहे.
सिग्नलवरून पुढे गेलेल्या वाहनांच्या माहितीचे संगणक प्रणालीद्वारे विश्लेषण केले जाईल. तसेच सिग्नल सिंक्रोनायजेशनही यामुळे शक्य होणार आहे. रस्त्यावर वाहनांची संख्या जास्त असले तेव्हा प्रतीक्षा कालावधी वाढेल व जेव्हा गर्दी नसेल तेव्हा सिग्नल लवकर सुटणार आहे.
सिग्नल खराब झाल्यास किंवा वाहतूक कोंडी झाल्यास त्याची माहिती स्मार्ट सिटीच्या कमांड ॲण्ड कंट्रोल सिस्टीम रूमला मेसेजद्वारे कळणार आहे, असे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.