पुणे (Pune) : सोलापूर रेल्वे विभागातील भिगवण-वाशिंबे सेक्शनमधील दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले. त्यामुळे सुमारे चाळीस मिनिटांची बचत होणार आहे. मात्र प्रवाशांना त्यासाठी आणखी किमान वर्षतरी थांबावे लागणार आहे.
मुंबई - चेन्नई या १२७७ किमीच्या मार्गावर केवळ सोलापूर विभागात दुहेरीकरणाचे व विद्युतीकरणाचे काम शिल्लक राहिले होते. त्यामुळे पुण्याहून दक्षिण भारतात जाणाऱ्या गाड्यांना पुणे ते सोलापूर दरम्यान चार ठिकाणी क्रॉसिंगसाठी थांबावे लागत होते. आता सर्व गाड्यांना क्रॉसिंगला थांबावे लागणार नाही. त्यामुळे पुणे ते सोलापूर दरम्यान चाळीस मिनिटांची बचत होणार आहे. मात्र प्रवाशांना त्यासाठी आणखी वर्षभर थांबावे लागणार आहे. कारण रेल्वे प्रशासन रेल्वेगाड्याच्या वेळापत्रकात आता तरी कोणता बदल करणार नाही. आता रेल्वे चालू वेळापत्रकानुसार धावतील. पुढच्या वर्षीच्या वेळापत्रकात बदल होईल, तेव्हाच वेळेत चाळीस मिनिटांची बचत होणार आहे.
सुरक्षा आयुक्तांकडून पाहणी
भिगवण ते वाशिंबे या २८.४८ किलोमीटर मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाले. मध्य विभागाचे मुख्य सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी मंगळवारी या मार्गावर झालेल्या कामाची तपासणी केली. यावेळी त्यांनी रूळ, ओएचई, सिग्नलिंग संदर्भातील कामे तपासली. भिगवण-वाशिंबे दरम्यानच्या दुहेरीकरण झालेल्या मार्गावरून विद्युत इंजिन ताशी १२० किलोमीटर वेगाने धावून वेगाची व रुळांची चाचणी घेतली. यावेळी सोलापूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश गुप्ता, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक एल. के. रणयेवले, वरिष्ठ विभागीय विद्युत इंजिनिअर अनुभव वार्ष्णेय,आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सोलापूर विभागातील दुहेरीकरणाचे व विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले. आता रेल्वे दोन्ही मार्गावरून धावू लागतील. मात्र त्या आताच्या वेळापत्रकानुसार धावतील. पुढच्या वर्षी नव्या वेळा पत्रकात बदल होईल. तेव्हा प्रवासाचा वेळ वाचणार आहे.
- प्रदीप हिरडे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर