पुणे (Pune) : महापालिकेत समाविष्ट झालेल्या ११ गावांमधील सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी तब्बल ३९२ कोटी रुपये खर्च करून प्रकल्प राबविला जात आहे. आधी या प्रकल्पाचे काम करून घेण्यासाठी सल्लागार नव्हता म्हणून काम ठप्प झाले होते. पण आता कामाची विभागणी करून दोन स्वतंत्र सल्लागार नियुक्त केले जाणार आहेत. एक सल्लागार मैलावाहिनी टाकण्यासाठी तर तर दुसरा सल्लागार हा मैलापाणी शुद्धीकरण केंद्राचे (एसटीपी) बांधकाम करून ते चालविण्यासाठी नियुक्त केला जाणार आहे. एसटीपी बांधणे आणि पाच वर्षे चालविणे यासाठी २ कोटी ३९ लाख रुपये खर्च येणार आहे.
शहराच्या हद्दीलगतची ११ गावे २०१७ मध्ये महापालिकेत समाविष्ट करण्यात आली. या गावांचा विस्तार गतीने होत असल्याने येथे सर्वप्रथम मैलापाण्याची यंत्रणा उभी करण्यास प्राधान्य देण्यात आले. प्रायमुव्ह इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कन्सल्टंट प्रा. लि.ची सल्लागार म्हणून नियुक्ती करून या प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्यात आला. या संस्थेने ३९२ कोटीचा प्रकल्प आराखडा सादर केल्यानंतर या कामाचे टेंडर काढण्यात आले. त्यामध्ये गेल्यावर्षी महापालिकेत आरोपप्रत्यारोपांचे राजकारण तापले होते. अखेर १३ मार्च २०२२ रोजी या प्रकल्पाचे भूमीपूजन झाले.
तीन ठिकाणी १० टक्केच काम
११ गावांमध्ये १६७ किलोमीटर लांबीची मैलावाहिनी टाकणे व दोन एसटीपी बांधणे याचा आराखड्यात समावेश आहे. पण प्रायमुव्हकडे केवळ आराखडा तयार करून देण्याची जबाबदारी होती, त्यामुळे प्रकल्पाची अंमलबजावणीसाठी सल्लागार नियुक्त केला नसल्याने या प्रकल्पाचे काम भूमीपूजन होऊनही ठप्प झाले होते. अखेर या प्रकल्पातील १६७ किलोमीटरची मलवाहिनी टाकण्यासाठी सल्लागार म्हणून प्रायमुव्ह संस्थेची नियुक्ती करण्यास आयुक्तांनी मान्यता दिली. आत्तापर्यंत लोहगाव, मांजरी, आंबेगाव या तीन ठिकाणी मिळून ८ ते १० टक्केच काम झालेले आहे.
अशी आहे प्रक्रिया...
- मैलापाणी एसटीपीमध्ये आणून त्यावर प्रक्रिया करून ते पाणी नदीत सोडले जाणार
- मांजरी बुद्रूक येथे ९३.५ एमएलडी क्षमतेचा एसटीपी प्रस्तावित
- देवाची उरुळी, उंड्री, फुरसुंगी, मांजरी येथील मैलापाणी शुद्ध केले जाईल. तर
- मुंढवा येथील १२.५ एमएलडी एसटीपी केला जाणार
- केशवनगर, साडेसतरा नळी, हडपसर (उर्वरित) हा भाग जोडला जाणार
- मैलावाहिनी टाकण्यासाठी सल्लागार नियुक्त पण एसटीपीच्या कामासाठी ठेकेदार नियुक्त केला नव्हता.
- स्वतंत्र टेंडर प्रक्रिया राबवून प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर केला
मलनिःसारण प्रकल्प करताना त्यात मलवाहिनी टाकण्याचे काम हे स्थापत्यविषयक असल्याने त्यासाठी सल्लागार वेगळा आहे. एसटीपी बांधणे व चालविणे हे अभियांत्रिकीशी निगडीत काम असल्याने त्यासाठी स्वतंत्र टेंडर काढले आहे. हे दोन्ही कामे एकाच सल्लागारकडून करून घेणे शक्य नाही. आत्तापर्यंत या प्रकल्पाचे ८ ते १० टक्के काम पूर्ण झाले आहे. मार्च २०२५ पर्यंत प्रकल्प पूर्ण होईल.
- जगदीश खानोरे, अधिक्षक अभियंता, मलनिःसारण विभाग (प्रकल्प)