पुणे (Pune) : दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर पुढील १५ दिवसांसाठी शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यात येणार आहे. गुरुवारीही पुरवठा सुरळीत राहणार असून, दिवाळीत पाण्याची चिंता करण्याची गरज पडणार नसल्याने पुणेकरांचा सण आणखीन गोड होणार आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पुण्यात पाऊस चांगला झाला, त्यामुळे पुढील वर्षभराचा पुण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून दर गुरुवारी शहराच्या वेगवेगळ्या भागांत पुरवठा बंद ठेवून तेथील जलवाहिन्या, विद्युत पंप, पाण्याच्या टाक्या व अन्य तांत्रिक देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यावर भर दिला जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पुरवठा सुरळीत केला जातो.
महापालिकेने काही दिवसांपूर्वीच पुण्यातील पुरवठा बंद ठेवून देखभाल-दुरुस्तीची, अत्यावश्यक कामे करून घेतली आहेत. त्यामुळे दिवाळी काळात पुरवठा सुरळीत राहणार आहे. नागरिकांची गैरसोय होणार नाही.
दिवाळीत पुण्याचा पाणीपुरवठा सुरळीत राहावा, यासाठी काही दिवसांपूर्वीच देखभाल-दुरुस्तीची कामे केली आहेत. पुरवठ्यात कुठलीही अडचण येऊ नये, याकडे पाणीपुरवठा विभागाकडून विशेष लक्ष दिले जाणार आहे.
- नंदकिशोर जगताप, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग, पुणे महापालिका