पुणे (Pune) : चांदणी चौकातील (Chandni Chowk) पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाच्या (University Chowk Flyover) कामाला प्राधान्य देण्यात येणार असून, या पुलाबाबत एक गुड न्यूज (Good News) आहे. विद्यापीठ चौकातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात (आचार्य आनंदऋषी चौक) उड्डाणपूल उभारण्याच्या नियोजित कामाचा कालावधी जवळपास नऊ महिन्यांनी कमी करता येऊ शकतो, असा अहवाल सल्लागार कंपनीने पुणे महानगर नियोजन प्राधिकरणाकडे (PMRDA) सादर केला आहे. त्यासाठी पुलाच्या आराखड्यात काही बदल या सल्लागार कंपनीने सुचविले असून, पीएमआरडीएने तो टाटा-सिमेन्स या कंपनीला सादर केला आहे.
दरम्यान, पुलाच्या कामासाठी विद्यापीठ चौकाच्या दिशेने बॅरेकेडिंग करण्यास सुरवात झाली आहे. तसेच, पुलाच्या पिलर्ससाठी पाईलिंग करण्याचे काम सुरू झाले आहे. पुणे विद्यापीठ चौकात दुमजली उड्डाणपूल उभारण्याचे काम सहा ऑक्टोबरला सुरू करण्याचा निर्णय ‘पुमटा’च्या बैठकीत घेण्यात आला होता. तसेच, विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे काम नोव्हेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उदिष्ट असल्याचे पीएमआरडीएने सांगितले होते. हा कालावधी आणखी कमी कसा करता येईल, यादृष्टीने विचार करून अहवाल सादर करावा, असे आदेशही या बैठकीत दिले होते.
दरम्यान, चांदणी चौकातील पूल पाडण्याचे काम पूर्ण झाले. मात्र, हा पूल पाडल्यानंतर चांदणी चौकातील अतिरिक्त दोन लेनचे काम पूर्ण करावे, तोपर्यंत पुणे विद्यापीठ चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू करू नये, तसेच यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी महापालिका आयुक्त आणि पीएमआरडीए यांची एकत्रित बैठक बोलविण्याचे ठरले होते. त्यामुळे पुढील आठवड्यात उड्डाणपुलाचे काम सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, महापालिकेकडून काम वेळेत पूर्ण न झाल्यामुळे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे काम पुढील आठवड्यातही सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
उड्डाणपुलाचे काम कमी कालावधीत कसे करता येईल, याबाबत पीएमआरडीएने सल्लागार कंपनीकडे विचारणा केली होती. त्यावर आधुनिक तंत्रज्ञान आणि उड्डाणपुलाच्या आराखड्यात काही बदल सुचवून हे काम जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण करता येऊ शकते, असा अहवाल कंपनीने दिला. तो पीएमआरडीएने टाटा-सिमेन्स कंपनीला सादर केला. यामुळे सध्या पुलासाठी सुरू केलेल्या कामावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे ‘पीएमआरडीए’चे मुख्य अभियंता विवेक खरवडकर यांनी सांगितले. विद्यापीठ चौकात पुलाचे काम सुरू करण्यापूर्वी मॉर्डन हायस्कूल येथील १२०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी हलविण्याचे काम या आठवड्यात ते पूर्ण होणे अपेक्षित आहेत. दरम्यानच्या कालावधीत पीएमआरडीएने ई-स्क्वेअरपासून विद्यापीठ चौकाच्या दिशेने बॅरेकेडिंग करण्यास सुरूवात केली आहे.
उड्डाणपुलासाठी आवश्यक पिलर्स उभारण्यासाठी पाईलिंग करण्याचे काम सुरू झाले आहे. मंगळवारपासून फिरोदिया बंगला ते विद्यापीठ चौकापर्यंत बॅरेकेडिंग करण्यात आले. तोपर्यंत महापालिकेचे जलवाहिनी हलविण्याचे काम पूर्ण होईल. त्यानंतर पुढील आठवड्यापर्यंत विद्यापीठ चौकात उड्डाणपुलाच्या कामाला सुरवात होणार असल्याचे पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.