पुणे (Pune) : पुण्याहून हावडासाठी (Pune - Howrah) लवकरच विशेष कार्गो एक्स्प्रेस (Special Cargo Express) सुरू होत आहे. ही पुणे विभागाची पहिली कार्गो पार्सल एक्स्प्रेस (Cargo Parcel Express) असणार आहे.
टपाल खाते व रेल्वे मंत्रालय हे एकत्रित येऊन ही विशेष रेल्वे सुरू करत आहे. त्यामुळे ज्यांना रेल्वेने पुणे ते हावडादरम्यान आपले एखादे पार्सल पाठवायचे असेल, त्यांनी जवळच्या टपाल कार्यालयात जाऊन आपले पार्सल जमा केल्यास ते पार्सल कमी वेळेत व तुलनेने कमी खर्चात संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचू शकते.
या सेवेचा लाभ कसा घ्याल
जर तुम्हाला रेल्वेद्वारे पार्सल पाठवायचे असेल, तर त्यासाठी आता स्थानकावर जाण्याची गरज नाही. कारण तुमच्या घरी येऊन ती वस्तू घेतली जाईल आणि इच्छित स्थळीदेखील पोचवली जाईल. रेल्वे व टपाल प्रशासन दोघे एकत्रित येऊन ग्राहकांना ही सेवा देणार आहेत. दोन शहरांत रेल्वेद्वारे पार्सलची वाहतूक होईल, तर शहरांतर्गातील वाहतूक टपाल खात्याकडून केली जाईल. ‘गतिशक्ती एक्स्प्रेस कार्गो सेवा’ असे याचे नाव असून, येत्या महिनाभरात ही सेवा पुण्यातून सुरू होईल.
कशी आहे कार्गो एक्स्प्रेस
- कार्गो पार्सल एक्स्प्रेससाठी नॉन मॉडिफाइड गुड्स (एनएमजी) डबे वापरले जातात.
- या रेल्वेला १८ डबे जोडलेले आहेत. एक डब्यात १८ टन मालाची क्षमता.
- डब्यात बीटीयू डेक्सचा वापर, त्यामुळे आतील वस्तू घसरणार नाहीत.
- वस्तू ठेवण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या बॉक्सचा वापर, सीझर लिफ्ट, ट्रॉली आदी सुविधा
काय आहेत वैशिष्ट्ये
- ग्राहकांना घरी बसूनच पार्सलच्या सेवेचा लाभ
- स्थानकावर जाण्याची गरज नसल्याने वेळेची होणार बचत
- वाहतूक करताना वस्तूची सुरक्षिततादेखील महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यासाठी विशिष्ट अशा मोठ्या बॉक्सची निर्मिती
- ही सेवा हँड टू हँड आहे. पूर्वी रेल्वेची पार्सलसेवा केवळ दोन स्थानकांपुरती होती
- स्थानकाजवळच केंद्रे बनवली जातील, त्यामुळे पार्सल कार्यालयावर ताण येणार नाही
- या सुविधेसाठी रेल्वे व टपाल खात्याची स्वतंत्र यंत्रणा काम करेल
- आवश्यकता भासल्यास संपूर्ण पार्सल रेल्वे चालवेल. त्याच्या डब्यांची रचनादेखील वेगळी असेल
- टपाल खात्यामध्ये येऊन पार्सलची वस्तू नोंदणी केली तरी चालेल
- लवकरच ही अॅप बेससेवा सुरू होईल
माफक दरात सेवा
रेल्वे बोर्डाने पार्सल सेवेचा विस्तार करण्याचे ठरविले आहे. देशात सुमारे ७५०० रेल्वे स्थानके आहेत, तर दीड लाख टपाल कार्यालये आहेत. एवढ्या मोठ्या व्यापक स्तरावर पोचलेल्या यंत्रणेचा फायदा आता ग्राहकांना मिळणार आहे. तो देखील अगदी माफक दरात. कारण वस्तू घेऊन जाण्यासाठी अथवा घरी पोचविण्यासाठी प्रतिकिलो तीन रुपये असा टपाल खात्याचा
दर असणार आहे.
रेल्वेचा दर देखील किफायतशीर असणार आहे. त्यामुळे फळ-भाजीपाल्यापासून ते वाहन पाठविण्यापर्यंत सर्वच वस्तू ग्राहकांना आपल्या घरातून पाठविणे शक्य होणार आहे.