पुणे (Pune) : उरुळी देवाची आणि फुरसुंगी (Fursungi) गावात महापालिकेचा कचरा प्रक्रिया प्रकल्प, ७०० कोटींच्या दोन नगर रचना योजना (टीपी स्कीम), मलःनिसारण प्रकल्पाअंतर्गत टाकण्यात येणारी ४१ किलोमीटर लांबीची मलवाहिनी अशा कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांचे आता पुढे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे ११ गावांच्या विकास आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात असताना आता त्यातून या दोन्ही गावांना वगळण्याची नामुष्की येणार आहे.
उरुळी देवाची आणि फुरसुंगी या गावांसाठी संयुक्त नगरपालिका स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी आज केली. उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथे कचरा डेपो असल्याने महापालिकेचा कचरा तेथे टाकला जातो. ग्रामस्थांनी त्याविरोधात आंदोलन केल्यानंतर कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी व शास्त्रीय पद्धतीने कॅपिंग करण्यासाठी या ठिकाणी शेकडो कोटी रुपये खर्च करण्यात आला. त्यामुळे हा भाग आता दुर्गंधीमुक्त झाला आहे. २०१७ ला ही दोन्ही गावे महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर पायाभूत सुविधांची कामे सुरू करण्यात आली. मात्र मिळकतकर मोठ्या प्रमाणात वसूल केला जात असल्याने नागरिकांत नाराजीचा सूर आहे. या गावांत मलःनिसारण, पाणी पुरवठा, सौरऊर्जा प्रकल्प, टीपी स्कीम असे महत्त्वाचे प्रकल्प प्रस्तावित होते. या दोन्ही गावांत महापालिका दरवर्षी टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी किमान १० कोटी रुपये खर्च करते. कचरा गोळा करणे, स्वच्छता यासाठीही निविदा काढण्यात आली आहे.
७०० कोटींची टीपी स्कीम
उरुळी देवाची, फुरसुंगी येथे टीपी स्कीम करण्याचा प्रस्ताव मुख्यसभेने २०१९ मध्ये मंजूर केला. फुरसुंगी येथे २६१ हेक्टर, तर उरुळी देवाची येथे ११० हेक्टरची टीपी स्कीम प्रस्तावित आहे. यासाठी या दोन्ही गावांतील जागामालक, शेतकऱ्यांच्या अनेकदा बैठका घेऊन यामुळे होणारे फायदे समजावून सांगितले. तसेच पीएमआरडीएचा ६५ मीटर रुंदीचा रिंगरोडही प्रस्तावित आहे. पुढील वर्षभरात येथे प्रत्यक्षात काम सुरू होणार होते व तीन वर्षांत या टीपी स्कीम पूर्ण विकसित होणार होत्या. यासाठी सुमारे ७०० कोटींचा खर्च केला जाणार होता. मात्र आता ही गावे महापालिकेतून वगळण्यात आल्याने टीपी स्कीमबाबत पुढील निर्णय काय होतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
बाळासाहेबांच्या शिवसेनेला लाभ?
२०२२ साठी तयार केलेल्या तीन सदस्यीय प्रभाग रचनेत ही दोन्ही गावे दोन-तीन प्रभागांत विभागली गेली. पण ही प्रभाग रचना रद्द झाली आहे. आता ही दोन्ही गावे वगळण्यात आल्याने पुढील प्रभाग रचनेत राजकीय समीकरणे बदलणार आहेत. पुरंदर विधानसभा मतदारसंघात ही नगरपालिका येणार असल्याने याचा फायदा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला होणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळेच माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यासाठी आग्रही होते.
मलःनिसारणाचे काय?
महापालिकेने समाविष्ट ११ गावांसाठी ३९२ कोटी रुपयांचा मलःनिसारण प्रकल्प हाती घेतला आहे. गेल्या वर्षी त्याचे काम सुरू झाले आहे. या प्रकल्पात एकूण १६७ किलोमीटरची मलवाहिनी टाकली जाणार आहे. त्यात उरुळी देवाची येथे २३.८ किलोमीटर आणि फुरसुंगी येथे १७.४ किलोमीटर मलवाहिनी टाकण्याचे काम पुढील दोन महिन्यांत सुरू होणार होते. पण आता ही कामे कशी मार्गी लागणार, याची नागरिकांना उत्सुकता आहे.
"उरूळी देवाची आणि फुरसुंगी येथे टीवी स्कीम, मलःनिसारण यासह इतर प्रकल्पांचे काम सुरू होणार होते. त्यामुळे ही गावे वगळू नयेत अशी आमची भूमिका होती. ही गावे वगळण्याचा निर्णय घेतल्याने येथील प्रकल्पांचे काम होणार नाही. नगर पालिकेमार्फत तेथील कामकाज होईल."
- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका
निर्णयाचे स्वागत; पण कारभार लवकर व्हावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्णयाचे स्वागत आहे.जुन्या महापालिकेत समाविष्ट केल्याने हा भाग दुर्लक्षित होता.गेल्या चार वर्षात गावाचा काहीच विकास झाला नाही.नवीन नगरपालिका झाल्याने लोकप्रतिनिधींची संख्या वाढेल.गावाचा सर्वांगी विकास होण्यात यश येईल.
- संजय हरपळे, माजी उपसरपंच फुरसुंगी