पुणे (Pune) : पुण्याच्या विकासाबात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठे विधान केले आहे. रिंगरोडसाठी ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. येत्या १० वर्षांत १ ते १० लाख कोटी रुपयांचे मूल्य रिंगरोडमधून तयार होईल. त्यामुळे हा रिंगरोड पुण्याच्या विकासाचे इंजिन ठरेल. यासाठी भूमी अधिग्रहगणासाठी नवीन्यपूर्ण प्रारूप आवश्यक आहे. तज्ज्ञांकडून याबाबत आलेल्या नव्या कल्पनांचेही स्वागत केले जाईल. पुण्यात मेट्रोच्या दोन टप्प्याचे काम वेगाने होत आहे. शहरांमध्ये ‘इलेक्ट्रिक व्हेईकल’च्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. तसेच, पर्यायी इंधनाचा सर्वाधिक वापर करणे शहर व्हावे, यासाठी प्रयत्न असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पुण्यात होणाऱ्या मल्टिमॉडेल रिंगरोडमुळे पुढील दहा वर्षांमध्ये शहराच्या परिसरातील विकासाला चालना मिळेल. हा रिंगरोड पुण्याच्या विकासाचे इंजिन ठरेल, असा विश्वास फडणवीस यांनी रविवारी ‘एमसीसीआयए’च्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला.
राज्यातील पीएमआरडीए आणि एमएमआरडीए ही औद्योगिक विकासाची केंद्रस्थाने आहे. त्यामुळे येथून निर्यातीचे प्रमाणही मोठे आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या ‘ग्लोबल स्टार्टअप इंडेक्स’मध्ये पुणे अव्वल आहे. येथे ‘स्टार्टअप इकोसिस्टीम’ चांगली आहे, अशा शब्दांत फडणवीस यांनी पुण्याचे कौतुक केले.
पुण्याच्या आर्थिक विकासात पुणे विमानतळाचे मोठे योगदान आहे. जगातील प्रमुख देश पुण्याशी जोडले गेले आहेत. पुणे येथून विमानाच्या फेऱ्या वाढविण्याची गरज आहे. लोहगाव विमानतळ हे हवाई दलाचे आहे. त्यामुळे पुण्यासाठी नवे विमानतळ आवश्यक आहे. पुरंदर येथे नवे विमानतळ उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येथे विमानतळासोबत कार्गो आणि लॉजिस्टिक पार्क उभारण्याचाही विचार केला जात आहे. नवी मुंबई विमानतळाला पुण्याशी जोडले जाईल, यामुळे पुण्याला त्याचा फायदा होईल, असे फडणवीस म्हणाले.
देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॉलर एवढी करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असून ते साध्य करायचे असेल तर महाराष्ट्रालाही ट्रिलीअन डॉलर अर्थव्यवस्था व्हावी लागेल. राज्याच्या ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेत मराठा चेंबर्स आणि पुण्यातील औद्योगिक परिसराची मोठी भूमिका राहील, असेही ते म्हणाले.