पुणे (Pune) : सोलापूर रस्ता ते पुणे बंगळूरदरम्यानच्या सुमारे ३१ किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित रिंगरोडच्या कामासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मागविलेल्या टेंडरची मुदत संपुष्टात आली. तीन टप्प्यांच्या या कामासाठी आठ कंपन्यांनी मुदतीत टेंडर भरले आहेत. त्या टेंडरची छाननी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी सुटण्यासाठी ‘एमएसआरडीसी’कडून रिंगरोडचे काम हाती घेण्यात आले आहे. पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग रिंगरोडचे करण्यात आले आहे. त्यामध्ये पूर्व भागातील रिंगरोड पाच तालुक्यांतून जातो. त्यामध्ये हवेली तालुक्याचा देखील समावेश आहे. या भागातील रिंगरोडसाठी आतापर्यंत सत्तर टक्के जमिनीचे भूसंपादन महामंडळाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचआय) पुणे ते औरंगाबाददरम्यान ग्रीन कॅरिडोअरचे काम हाती घेतले आहे. हा प्रस्तावित रस्ता आणि रिंगरोड काही ठिकाणी एकत्र येत असल्यामुळे सोलापूर ते पुणे-बंगळूर रस्त्या दरम्यानच्या ३१ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम प्राधिकरणाने करावे, असे यापूर्वी ठरले होते. त्यामुळे ३१ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचा भाग वगळून उर्वरित रस्त्याच्या कामासाठी निविदा मागविल्या होत्या. परंतु प्राधिकरणाने मध्यंतरी निर्णयात बदल करीत या ३१ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम पुन्हा महामंडळानेच करावे, असे सांगत तो रस्ता पुन्हा ‘एमएसआरडीसी’कडे वर्ग केला. त्यामुळे आता ‘एमएसआरडीसी’ने या ३१ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे तीन टप्पे करून त्यासाठी निविदा मागविल्या होत्या. टेंडर भरण्याची अंतिम मुदत सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दिली होती. या मुदतीत आठ कंपन्यांनी टेंडर भरले आहेत. दाखल टेंडरची तांत्रिक छाननी करण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी नाव नेण्याच्या बोलीवर सांगितले. त्यामुळे रिंगरोडचे काम बारा टप्प्यांत होणार आहे. या पूर्वी काढण्यात आलेले टेंडर या इस्टिमेट रकमेपेक्षा चाळीस ते पंचेचाळीस टक्के जादा दराने आल्यामुळे त्या वादग्रस्त ठरल्या आहेत.
असा आहे पूर्व भागातील रिंगरोड
- पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग नाशिक-सोलापूर आणि सातारा-बंगळूर महामार्गाला जोडणारा
- मावळ, खेड, हवेली, पुरंदर आणि भोर तालुक्यांतून जाणार
- पाच तालुक्यांतील ४६ गावांतून हा रिंगरोड जाणार
- एकूण लांबी १०३ किलोमीटर, तर ११० मीटर रुंदीचा असणार
- सहापदरी महामार्ग, एकूण सात बोगदे, सात अंडरपास, दोन नदीवरील आणि दोन लोहमार्गावरील पूल
- ८५९.८८ हेक्टर जागा संपादित करावी लागणार. त्यासाठी अंदाजे १४३४ कोटी खर्च
- महामार्ग बांधणीचा खर्च सुमारे चार हजार ७१३ कोटी.
या गावांतून जाणार रिंगरोड
तालुका मावळ : परंदवाडी, उर्से, तळेगाव, वडगाव, कातवी, आंबी, वराळे, आकुर्डी, नाणोली तर्फे चाकण, इंदुरी, सुदवडी, सुदुंबरे.
तालुका खेड : खालुंब्रे, निघोजे, मोई, कुरळी, चिंबळी, केळगाव, आळंदी, चऱ्होली खुर्द, धानोरे, सोळू, मरकळ, गोळेगाव.
तालुका हवेली : तुळापूर, भावडी, लोणीकंद, पेरणे, बकोरी, डोंगरगाव, वाडेबोल्हाई, गावडेवाडी, मुरकुटेनगर, भिवरी, पेठ, कोरेगाव मूळ, शिंदवणे, वळती, तरडे, आळंदी म्हातोबाची.
तालुका पुरंदर : सोनोरी, काळेवाडी, दिवे, हिवरे, चांबळी, कोडीत खुर्द, गराडे.
तालुका भोर : कांबरे, नायगाव, केळवडे