पुणे (Pune) : लाडक्या बहिणी, लाडके भाऊ ,शेतकरी, मुस्लिम, आदिवासी ते सर्व समाज घटकाला आर्थिक सक्षम करण्यासाठी जी पाऊले आम्ही उचलली आहेत ती पुढील पाच वर्षात ही कायम ठेवणार असून पुढील काही दिवसात पुणे नगर रोड वरील संपूर्ण वाहतूक कोंडी संपवण्यासाठी जंबो फ्लाय ओव्हर करण्याची गॅरंटी देतो असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूरकरांना आश्वासित केले.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर,माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित जन सन्मान यात्रेच्या जाहीर सभेत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवी काळे यांच्या प्रस्तवनेनंतर थेट भाषणाला उभे राहिलेल्या अजित पवार यांनी सर्व स्तरातील वैयक्तीक लाभाच्या योजनांचा आढावा घेत सांगितले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही पुढील महायुतीच्या सरकारच्या काळात चालू राहणार असून विरोधक जी टीका करतात ती निराधार आहे, कारण मी आत्तापर्यंत १० वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला असून चालू अर्थसंकल्प हा ६५ लाख कोटींचा असून ४२ लाख कोटींपेक्षा जास्त महाराष्ट्राचे स्थूल उत्पन्न हे राज्याची आर्थिक सुस्थिती दर्शविते. त्यामुळे विरोधकांनी आता राज्याची आणि आम्ही जाहीर करत असलेल्या लोक कल्याणकारी योजनांची काळजी करू नये.
मी १९९१ शिरूरचा लोकसभेचा खासदार होतो, त्यामुळे शिरूर, हवेली आणि या भागातल्या सामाजिक, प्रशासकीय, संस्थात्मक विकास कामांमध्ये माझे सर्वाधिक योगदान आहे. स्वराज्य रक्षक छञपती संभाजी महाराज यांचे स्मारक ३०० कोटी एवढ्या विक्रमी निधीमध्ये आपण उभे करत असून शिरूर-हवेलीकरांची सर्वात मोठी डोकेदुखी असलेली पुणे-नगर रोडची वाहतूक कोंडी आपण जंबो फ्लाय ओव्हरने शिरूर वाघोलिकरांना ट्रॅफिक मुक्त करणार म्हणजे करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीच्या जिल्हा महिलाध्यक्ष मोनिका हरगुडे, आरती भुजबळ, माजी जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, घोडगंगा संचालक दादा पाटील फराटे,बाबासाहेब फराटे, राजेंद्र जगदाळे, शशिकांत दसगुडे, सुधीर फराटे, राजेंद्र कोरेकर, स्वप्नील ढमढेरे, विठ्ठलराव ढेरंगे, चंदन सोंडेकर, शांताराम कटके, राजाराम गव्हाणे, शरद कालेवर, शिवाजी दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मग व्यंकटेश का बंद केला नाही ?
घोडगंगा कारखाना माझ्यामुळे बंद झाल्याची चकाटी शिरूरमध्ये उठवली जात आहे. मी घोडगंगा सुरू ठेवण्यासाठी नुकतेच ३५ कोटी दिले आहेत. तरीही मी कारखाना बंद पाडला असेल तर व्यंकटेश साखर कारखाना का बंद पडला नाही असे म्हणत पवार यांनी आमदार अशोक पवार नामोल्लेख टाळत कोपरखळी मारली व अनुभव नसलेल्या मुलाला कारखाना अध्यक्ष केल्यामुळे ही दुर्वस्था झाल्याची खंत बोलून दाखवली.