चाकण परिसरातील नवीन रस्त्यांसह रुंदीकरणासाठी 179 कोटी; 'त्या' प्रकल्पासाठी एमआयडीसीची 4 एकर जागा

Ajit Pawar
Ajit PawarTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : पुणे जिल्ह्यासह राज्याच्या औद्योगिक विकासात महत्त्वाचे योगदान असणाऱ्या चाकण परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी रहदारीच्या ठिकाणी वाहनतळ उपलब्ध करून देणे, राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणे हटविणे, कंपन्यांमधील कर्मचारी येण्या-जाण्याच्या वेळांमध्ये औद्योगिक परिसराबाहेर अवजड वाहने थांबविणे आदी उपाययोजना तातडीने कराव्यात. चाकणकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने पुण्याच्या जिल्हाधिकारी आणि पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तांनी स्वत: परिसराची पाहणी करावी आणि तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले.

Ajit Pawar
Mumbai : मढ-वर्सोवा पुलाचे टेंडर 'या' कंपनीच्या खिशात; 2029 कोटी रुपयांची यशस्वी बोली

चाकण (ता. खेड) परिसरातील वाहतूक कोंडी समस्येबाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात आढावा घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, चाकण येथील तळेगाव चौकात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असून येथील वाहतूक व्यवस्था सुरळित करण्यासाठी पोलीस विभागाने प्राधान्याने अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे. विनापरवाना रिक्षांची संख्या आटोक्यात आणावी. वाहतूक चोवीस तास नियंत्रित करून वाहनचालकांना शिस्त लावावी. सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसी, महसूल, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोलीस अशा सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने वाहतूक कोंडीवर तोडगा काढावा. परिसरातील रस्ते, महामार्गांवरील सर्व प्रकारची अतिक्रमणे तातडीने काढून टाकावीत. अतिक्रमण काढण्याची कारवाई नियमितपणे करावी. चाकण परिसरातून जाणाऱ्या चार पदरी महामार्गाच्या बाजूला असणारी मोकळी जागा एमआयडीसीने उपलब्ध करून द्यावी. त्याठिकाणी महामार्ग प्राधिकरणाने सहा पदरी रस्त्याचे काम प्राधान्याने सुरु करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

Ajit Pawar
Pune : वेळ निघून गेल्यानंतर पालिका प्रशासनाची धावपळ; पण उपयोग काय?

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जाऊ लागू नये याची खबरदारी घेऊन तळेगाव चौकातील वाहतूक सुयोग्य पद्धतीने पर्यायी मार्गावर वळवावी. सकाळी तसेच सायंकाळी कंपन्या सुटण्याच्या कालावधीत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. ही बाब लक्षात घेऊन या गर्दीच्या वेळी वाहतूक नियंत्रणासाठी पीएमआरडीएने भंडारा डोंगराच्या बाजूला असणाऱ्या गायरान जमिनीवर जड वाहनांना थांबवून ठेवण्यासाठी ट्रक टर्मिनसची सुविधा उभारावी, अशी सूचना त्यांनी केली. वाहनतळांची संख्या वाढविण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, चाकण परिसरात येणाऱ्या अवजड वाहनांची संख्या जास्त आहे. त्यांच्यामुळे विविध चौकांत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ही समस्या कायमस्वरुपी सोडविण्यासाठी एमआयडीसीच्या हद्दीतील ट्रक टर्मिनलसाठीची नियोजित जागा पीएमआरडीएला हस्तांतरित करावी. त्या जागेवर वाहनतळ विकसित करण्याचे काम पीएमआरडीएने सुरु करावे. आपल्याकडे येणाऱ्या ट्रक, कंटनेरच्या पार्किंगची व्यवस्था आपल्या आवारातच करण्याबाबत संबंधित कंपन्यांना बंधनकारक करण्यात यावे. वोक्सवॅगन कंपनीसमोर असणाऱ्या पाझर तलावाच्या जागा परिसराचा वापर करून नवीन वाहनतळ उभारावे. त्यातून मध्यवर्ती भागात वाहने उभी करण्यास जागा उपलब्ध होईल, असे निर्देशही त्यांनी दिले.

Ajit Pawar
Pune : पुण्यातील 'त्या' भूखंडावरील आरक्षण उठविण्याच्या निर्णयाला स्थगिती

चाकण परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी नवीन रस्त्यांसह रुंदीकरणासाठी १७९ कोटींचा निधी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीचा वापर करून गतीने कामे करून घ्यावीत. औद्योगिक परिसरातील कचऱ्यासह आसपासच्या १७ गावांमधील कचऱ्यावर स्थानिक परिसरात प्रक्रिया करण्यासाठी एमआयडीसीने ४ एकर जागा उपलब्ध करून द्यावी. या जागेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कचरा प्रक्रिया केंद्र उभे करावे, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार दिलीप मोहिते पाटील, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे आदी उपस्थित होते. विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे विभागीय अधिकारी अंशुमन श्रीवास्तव, पीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसे, पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे, पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com