पुणे (Pune) : पुणे जिल्हा खाण व क्रशर उद्योजक संघाने काही मागण्यांसाठी ९ डिसेंबरपासून बेमुदत बंद सुरू केला आहे. या बंदमुळे शासन व व्यावसायिक दोघांचेही नुकसान होत आहे. मालाअभावी बांधकामे थांबल्याने त्यावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिक व मजुरांचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
काही जाचक अटी व गौण खनिजबाबत बदलते शासनाचे धोरण या विरोधात संघाने हा बंद पुकारला आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदनही देण्यात आले. मात्र नऊ दिवस उलटूनही या बंदवर कोणताही तोडगा निघालेला नाही. शासकीय स्तरावरही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा झालेली नाही. संघाने केलेल्या मागण्यांबाबत शासनाने विचार न केल्यास राज्यभर बंद करण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती संघाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष रामदास दाभाडे यांनी दिली. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.
या आहेत मागण्या...
- रॉयल्टीची रक्कम बिलात समाविष्ट करावी.
- रॉयल्टीमधेच सर्व कर घ्यावा, वेगळे कर नको.
- संस्थेसाठी घेण्यात येणारी १४ रुपये प्रति ब्रास रक्कम घेऊ नये.