पुणे (Pune) : चांदणी चौकातील (Chandni Chowk) प्रकल्पाचे काम करणाऱ्या ठेकेदारांनी (Contractors) खडक फोडण्यासाठी आवश्यक नसताना २० मिनिटांचा ब्लॉक घेतला. परिणामी, सोमवारी दिवसभर चांदणी चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. खडक फोडण्याचे काम निरंतर चालू राहणार आहे. त्यासाठी ब्लॉक घेण्याची आवश्यकता नव्हती. शिवाय या ब्लॉकची कल्पनादेखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (NHAI) नव्हती. त्यामुळे संबंधित ठेकेदारास समज देण्यात आली असल्याचे NHAI कडून सांगण्यात आले.
चांदणी चौकातील पूल पाडल्यावर वाहतूक कोंडीतून सुटका होईल, असे पुणेकरांना वाटले होते. मात्र त्याला पहिल्याच दिवशी धक्का बसला. कारण चांदणी चौकात पुलाचे व रॅम्पचे काम करणाऱ्या ठेकेदारांनी सेवा रस्त्यासाठी दुपारी १ वाजून २० मिनिटांनी अचानक २० मिनिटांचा ब्लॉक घेतला. अचानक घेतलेल्या ब्लॉकने पोलिसांना वाहतूक थांबवावी लागली. परिणामी वाहनांच्या रांगा ५ ते ६ किलोमीटरपर्यंत गेल्या. एक ते दीड किमीचे अंतर कापण्यासाठी तीन ते चार तास लागले. यात रुग्णवाहिका, शाळेच्या बसदेखील अडकून पडल्या. केवळ ठेकेदाराच्या आगाऊपणाचा फटका निम्म्या शहरातील वाहनधारकांना सहन करावा लागला.
वाहतूक कोंडीचाच ‘ब्लास्ट’
चांदणी चौकातील पूल पाडल्यावर दोन्ही बाजूच्या सेवारस्त्याचे काम सुरू झाले. रस्ता रुंदीकरणासाठी खडक फोडणे अनिवार्य आहे. खडक फोडण्यासाठी सोमवारी स्फोट केले गेले. हे काम पुढचे १० दिवस चालणार आहे. शिवाय खडक फोडण्यासाठी ब्लास्ट करण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरूच आहे. त्यावेळी मात्र ब्लॉक घेण्यात आला नव्हता. पुढच्या ब्लास्टसाठीदेखील ब्लॉक घेतला जाणार नाही. असे असताना ठेकेदारांनी आवश्यक नसताना ब्लॉक घेतला. परिणामी वाहतूक कोंडीचाच ‘ब्लास्ट’ झाला.
सोमवारी ब्लॉक घेण्याचे कोणतेच नियोजन नव्हते. ठेकेदारांनी त्याच्या स्तरावर घेतलेला तो निर्णय आहे. त्याबाबत त्यांना समज दिली आहे. खडक फोडण्याचे काम निरंतर सुरुच राहील. पण त्यासाठी कोणत्याही प्रकारचा ब्लॉक घेतला जाणार नाही.
- संजय कदम, प्रकल्प व्यवस्थापक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे
याची उत्तरे कोण देणार?
१. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला अंधारात ठेवून संबंधित ठेकेदाराने ब्लॉक घेतलाच कसा.
२. ब्लॉक घेताना कोणत्या यंत्रणेची परवानगी घेतली.
३. ब्लॉक जर ठरला होता तर त्याची वेळ का जाहीर केली नाही.
४. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण संबंधित ठेकेदारावर कारवाई करणार का?