पुणे (Pune) : पुलगेट ते हडपसर दरम्यानचा मेट्रो प्रकल्पाची मार्गिका कोणी करावी, यावर पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (PMRDA) आणि महामेट्रो (MAHAMETRO) यांची नुकतीच बैठक झाली. पुन्हा एक बैठक घेऊन त्यामध्ये यासंदर्भातील निर्णय घेतला जाणार आहे. त्यानंतर तो निर्णय ‘पुमटा’समोर (पुणे युनिफाईड अर्बन ट्रान्सपोर्ट ॲथॉरिटी) सादर करण्यात येणार आहे.
अशी आहे स्थिती...
- पुणे शहरात हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाचे काम ‘पीएमआरडीए’कडून हाती
- पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दरम्यान मार्गाचे काम महामेट्रोकडून हाती
- पीएमआरडीए आणि महामेट्रोने दोन्ही मार्गांच्या विस्तार करण्याचा निर्णय
- त्यानुसार हिंजवडी ते शिवाजीनगर हा मार्ग लोणीकाळभोरपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय
- खडकवासला ते खराडी २८ किलोमीटर मार्ग महामेट्रोकडून प्रस्तावित
- पीएमआरडीएच्या विस्तारित मेट्रो मार्ग हा शिवाजीनगर पुलगेट, हडपसर आणि लोणीकाळाभोर, तर एक फाटा सासवड रोडवर असा आहे
- महामेट्रोचा खडकवासला हा मार्ग स्वारगेट, पुलगेट-हडपसर फाटा ते खराडी असा आहे
- या दोन्ही मार्गावर पुलगेट ते हडसपर हा सुमारे आठ किलोमीटर लांबीचा मार्ग एकत्रित
महामेट्रोचे म्हणणे...
माण या ठिकाणी मेट्रोसाठी कार डेपो आहे. तसेच लोणीकाळभोर या ठिकाणी देखील मेट्राच्या कार डेपोसाठी आरक्षण ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पुलगेट ते हडपसर हा या मेट्रो मार्गाचे काम करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पीएमआरडीएची आहे. तर खडकवासला येथे मेट्रोसाठी कारडेपो करण्यात येणार आहे, त्यामुळे पुलगेट ते हडपसर या दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे काम आम्ही करतो, असे महामेट्रोचे म्हणणे आहे.
बैठकीत काय ठरले?
- विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली ‘पुमटा’ची बैठक
- पुलगेट ते हडपसर दरम्यान आठ किलोमीटर मार्गाचा तांत्रिक व आर्थिक अहवाल पीएमआरडीए आणि महामेट्रोने स्वतंत्रपणे तयार करावा
- आर्थिकदृष्ट्या कोणता प्रकल्प व्यवहार्य आहे, त्यावर कोणी त्या मार्गाचे काम करावे
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडूनही पीएमआरडीए आणि महामेट्रोला सूचना
प्रस्तावित कामे
- खडकवासला-स्वारगेट-पुलगेट-हडपसर फाटा (मगरपट्टासिटी) ते खराडी हा सुमारे २८ किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग महामेट्रोकडून प्रस्तावित
- शिवाजीनगर-पुलगेट-हडपसर ते लोणीकाळभोर हा १९ किलोमीटर मेट्रो मार्ग पीएमआरडीएने प्रस्तावित
- त्यापैकी पुलगेट ते हडपसर हा आठ किलोमीटरचा मार्ग कॉमन असल्याने तो कोणी विकसित करावा, यावर निर्णय घेण्यासाठी बैठक
पुलगेट ते हडपसर दरम्यानच्या मेट्रो मार्गासाठी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांसोबत बुधवारी बैठक झाली. या बैठकीत तांत्रिक मुद्यांवर चर्चा झाली. पुन्हा एक ते दोन बैठका होऊन अंतिम निर्णय घेतला जाईल. त्याचा प्रस्ताव ‘पुमटा’कडे सादर केला जाईल.
- डॉ. सुहास दिवसे, आयुक्त, पीएमआरडीए