पुणे (Pune) : डेक्कन क्वीनला (Deccan Queen) नवीन एलएचबी रेक गुरुवारी जोडण्यात आला अन् पहिल्याच दिवशी पॅन्ट्रीमध्ये बिघाड झाला. पॅन्ट्रीतील हॉट केसमध्ये बिघाड झाल्याने प्रवाशांना थंड पदार्थ खातच मुंबई गाठावी लागली. त्यामुळे पहिल्या दिवशी प्रवास करणाऱ्यांचा हिरमोड झाला.
पुणे - मुंबई दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन एक्सप्रेसला गुरुवारी नवीन रेक जोडण्यात आला. पुणे स्थानकावर प्रवाशांनी मोठ्या उत्साहात त्याचे स्वागत केले. मात्र प्रवासाच्या पहिल्याच दिवशीच पुणे ते कर्जत प्रवासादरम्यान पॅन्ट्रीतील हॉट केसमध्ये अचानक बिघाड निर्माण झाल्याने तो बंद होता. तसेच पॅन्ट्रीमध्ये फ्लेम लेस शेगडी असली तरीही त्यावर खाद्यपदार्थ बनविण्यास परवानगी नव्हती. त्यामुळे प्रवाशांना थंड खाद्यपदार्थ खावे लागले. गाडी मुंबईला गेल्यावर तिथे तो बिघाड दूर करण्यात आला. त्यामुळे परतीच्या प्रवासात हॉट केस सुरू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.
नव्या नियमांचा प्रवाशांना फटका
रेल्वे प्रशासनाने रेल्वे गाड्यांमध्ये आग लागण्याचे प्रमाण कमी व्हावे या करिता नव्या पॅन्ट्रीमध्ये गॅस शेगडीच्या वापरावर बंदी घातली आहे. त्याजागी फ्लेमलेस इलेक्ट्रिक शेगडीचा वापर करण्यास परवानगी दिली होती. मात्र त्याच्या वापरास देखील मनाई केली. त्यामुळे पॅन्ट्री कार चालकांना आपल्या बेस किचन मधून पदार्थ घेऊन प्रवाशांना द्यावे लागत आहेत.