पुणे (Pune) : ‘घरोघरी तिरंगा’ अभियानासाठी महापालिकेकडून पुरविण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या झेंड्यांमुळे नागरिकांनी संपात व्यक्त केला. ‘‘द्यायचा असेल तर चांगल्या दर्जाचा झेंडा द्या, तिरंग्याचा अपमान कशाला करायला लावता,’’ अशा शब्दांत नागरिकांनी प्रशासनाला सुनावले. दरम्यान, महापालिकेला मिळालेल्या १२ लाख झेंड्यांपैकी केवळ ४ लाख झेंडे चांगले निघाले असून, ते नागरिकांना वितरित करण्यात आले आहेत.
महापालिकेला केंद्र सरकारने अडीच लाख झेंडे पाठवले होते, पण त्यांचा दर्जा चांगला नसल्याने ते परत पाठविण्यात आले. महापालिकेला ठेकेदाराकडून पुरविण्यात आलेले निकृष्ट झेंडे परत पाठवून चांगले झेंडे देण्याचे आदेश देण्यात आले. महापालिकेला गेल्या दोन दिवसांत आणखी झेंडे पुरविण्यात आले. हे झेंडे क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून वितरित करण्यात आले. सोसायटी, वस्त्यांमध्ये महापालिकेने झेंडे पुरविले. त्यावेळी अशोक चक्र मध्यभागी नसणे, शिलाई व्यवस्थित नसणे, चुकीच्या पद्धतीने कापलेले झेंडे, डाग व अस्वच्छ कापड यामुळे नागरिक नाराज झाले. अशा प्रकारे झेंडे स्वीकारून आम्हाला अपमान करायला लावू नका, अशा प्रतिक्रिया आल्या, पण कर्मचाऱ्यांना उत्तर देता आले नाही.
‘‘ महापालिकेला १२ लाख झेंडे मिळाले होते, त्यापैकी चांगले असलेले ४ लाख झेंडे स्वीकारले आहेत. हे झेंडे क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून शहरात वाटप केले आहेत. नागरिकांनी त्यांच्या घरी ध्वजवंदन करून या उपक्रमात सहभागी व्हावे.’’
- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका