पुणे (Pune) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील (आचार्य आनंदऋषीजी महाराज चौक) दुमजली उड्डाणपुलाचे काम गतीने मार्गी लावण्यासाठी लोखंडी गर्डरमध्ये ‘यूएचएफआरपीसी’ तंत्रज्ञान करणे शक्य नसल्याचे ठेकेदार कंपनीने स्पष्ट केले आहे. मेट्रो आणि दुमजली उड्डाणपूल हा एकमेकांचा भाग असल्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे योग्य होणार नाही. पारंपरिक पद्धतीनेच (सिमेंट काँक्रिट) तो उभारणे योग्य राहील, असे ठेकेदार कंपनीचे म्हणणे आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान मेट्रो प्रकल्पाचे काम ‘पीएमआरडीए’ने हाती घेतले आहे. या प्रकल्पासाठी विद्यापीठ चौकात दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. हे काम जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण करावे, अशा सूचना यापूर्वी झालेल्या ‘पुमटा’च्या (पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण) बैठकीत सातत्याने दिल्या होत्या. त्यासाठी पारंपरिक पद्धतीऐवजी लोखंडी गर्डरमध्ये हा उभारण्याचा पर्याय पुढे आला होता. त्यानुसार टाटा कंपनीने अभ्यास करून अहवाल सादर केला.
त्यानुसार उड्डाणपुलाच्या कामाचा खर्च १७० कोटी रुपयांनी वाढत असल्याचे निदर्शनास आले होते. मात्र, पोलिसांकडून पुलाचे काम करण्यासाठी आवश्यक असलेले बॅरिकेडींग करण्यास परवानगी मिळत नसल्यामुळे अखेर टाटा कंपनीने ‘पीएमआरडीए’ला आणि ‘पीएमआरडीए’ने हे काम वेळेत पूर्ण करू शकत नसल्याचे स्पष्ट केले. त्यावरून या प्रकल्पाच्या कामाला आणखी विलंब लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पोलिसांकडून वेळेत परवानगी मिळाली असती, तर नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून पुलाचे काम पूर्ण करणे शक्य झाले असते. परंतु, तेही शक्य होणार नसल्याचे या पत्रावरून स्पष्ट झाले आहे. पारंपरिक पद्धतीने हे काम करावे लागणार असल्यामुळे उड्डाणपुलाच्या कामासाठी अधिक वेळ द्यावा लागणार आहे.