पुणे (Pune) : महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरणांतर्गत (MHADA) पुणे मंडळातर्फे जानेवारी महिन्यात सहा हजारांहून अधिक सदनिकांसाठी नूतन ऑनलाइन प्रणालीद्वारे (सॉफ्टवेअर) सोडत काढण्यात आली. या सोडतीचा निकाल जाहीर करून एक महिन्याचा कालावधी होत आला आहे, तरी विजेत्यांना देयकरार पत्र वितरित करण्यात आलेले नाही.
म्हाडाच्या पुणे महामंडळातर्फे जानेवारी महिन्यात काढण्यात आलेल्या सोडतीसाठी इंटिग्रेटेड लॉटरी मॅनेजमेंट सिस्टिम (आयएलएमएस) २.० हे सॉफ्टवेअर वापरण्यात आले. मानवी हस्तक्षेपाशिवाय, कमी वेळेत आणि पारदर्शक निकाल लावण्यासाठी म्हाडाकडून या सॉफ्टवेअरसाठी एका खासगी कंपनीचे टेंडर मान्य करून काम त्यांना देण्यात आले. परंतु, सॉफ्टवेअरमध्ये अनेक त्रुटी असल्याने कागदपत्रांची पूर्तता, प्रमाणीकरण, पुन्हा बदल, मुदतवाढ, दिरंगाई अशा अनेक कारणांमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले होते. त्याचे परिणाम निकालानंतर ही दिसून येत आहे.
२० मार्च रोजी सोडतीचा निकाल जाहीर झाला. त्यानुसार १० टक्के रक्कम अदा केली असली तरी अनेक विजेत्यांना देयकरार पत्र देण्यात आलेले नाही. ज्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात आलेली नाही, त्यांना विजेते करण्यात आले असून ज्यांनी आवश्यक कागदपत्र जोडली आहेत, त्यांना इतर कागदपत्रांच्या मागणीसाठी संपर्क साधला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे म्हाडातील अधिकाऱ्यांनी सांगितले.