पुणे (Pune) : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी (Traffic Problems In PMC & PCMC) कमी करण्यासाठी या रिंगरोडचे (Ring Road) काम एमएसआरडीसीने (MSRDC) हाती घेतले आहे. पश्चिम रिंगरोडला केळवडेपासून सुरुवात होणार असून हवेली, मुळशी आणि मावळ येथील उर्से टोलनाका येथे तो द्रुतगती मार्गाला मिळेल. रिंगरोडच्या पश्चिम भागातील मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. ३७ गावांमधून हा रिंगरोड जाणार असून, त्यासाठी ६९५ हेक्टर जमिनींचे संपादन करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) हाती घेतलेल्या पश्चिम भागातील रिंगरोडचे (Ring Road) भूसंपादन नोव्हेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मंगळवारी दिल्या. रिंगरोड हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याने या प्रकल्पाचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयाकडून सातत्याने आढावा घेण्यात येत आहे.
मागील १५ दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रकल्प विभागाचे महासंचालक राधेश्याम मोपलवार यांनी रिंगरोडसाठी जमिनींचे मूल्यांकन लवकर करण्यात यावे. तसेच भूसंपादन प्रक्रिया गतीने राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आज रिंगरोडच्या प्रगतीबाबत आढावा बैठक घेतली. त्यामध्ये या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
रिंगरोडच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारकडून पुरवणी अंदाजपत्रकात दीड हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यानुसार हा निधी एमएसआरडीसीकडे वर्ग करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाकडून या प्रकल्पाला गती देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यानुसार भूसंपादनाचे काम येत्या नोव्हेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना प्रांताधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.