पुणे (Pune) : कोरोनाच्या सुरवातीपासून अनेक आयटीयन्सला घरून काम देण्यात आले. आजही सुमारे ५० टक्के आयटीयन्स घरून काम करीत आहे. मात्र, प्रत्येकाच्या घरी वर्क फ्रॉम होमसाठी आवश्यक असलेल्या सुविधा असतीलच असे नाही. त्यामुळे ते को-वर्किंग स्पेसचा वापर करीत आहेत. तसेच, कोरोनाकाळात अनेक छोट्या कंपन्यांनी त्यांची भाडेतत्त्वावर असलेले ऑफिस कायमस्वरूपी बंद केले आहेत. त्यांच्या ज्या कर्मचाऱ्यांना घरून काम करणे शक्य होत नाही, त्यांची सोय कंपन्या को-वर्किंग स्पेसमध्ये करून देत आहेत.
वर्क फ्रॉम होम मिळाले. मात्र घर छोटे असल्याने, त्यातच घरी अचानक जास्त पाहुणे आल्यामुळे कामासाठी जागा मिळत नाही. त्यामुळे ऑफिसच्या वातावरणाचा फील मिळण्यासाठी आता अनेक आयटीयन्सची पावले ‘को-वर्किंग स्पेस’कडे वळू लागली आहेत. आयटी पार्क परिसरातील को-वर्किंग स्पेसची मागणी आयटीयन्सकडून वाढली आहे.
एकाच ठिकाणी सुविधा
टेबल, खुर्ची, इंटरनेट, वेबकॅम, कॉम्प्युटर अशा मूलभूत गरजांसह सुरक्षा, रिसेप्शन, साफसफार्इ, हाऊसकीपींग आणि पार्किंग अशा कोणत्याही बाबींचे नियोजन को-वर्किंग स्पेसमध्ये येणाऱ्यांना करावे लागत नाही. ही स्पेस उपलब्ध करून देत असलेली व्यक्ती या सर्वांचा काळजी घेते. त्यामुळेच या जागांचा वापर वाढला आहे.
कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर आणि आयटीचे वर्क फ्रॉम होम वाढल्यानंतर को-वर्किंग स्पेसचा वापर वाढला आहे. आमच्याकडे व्यक्ती आणि कंपनीही स्पेस घेत आहेत. पूर्वीच्या तुलनेत आयटीयन्स वैयक्तिकरीत्या येण्याचे प्रमाण ४० टक्क्यांनी वाढले आहे. पूर्ण नवीन जागा घेण्यापेक्षा को-वर्किंग परवडत असल्याने यास कंपन्या आणि नोकरदारांची पसंती मिळत आहे.
- निनाद सेलमोकर, ट्रायोस को-वर्किंग
मी काम करीत असलेल्या कंपनीने भाडेतत्त्वावर असलेले ऑफिस नोव्हेंबर २०२१ मध्ये बंद केले. त्यानंतर आम्हाला घरून किंवा को-वर्किंगमधून काम करण्याच्या सूचना दिल्या. घरून काम करणे शक्य नसल्याने मी को-वर्किंगचा पर्याय स्वीकारला. त्यासाठी भाडे कंपनी देते. कामाचा एक वेगळा अनुभव घेण्यासाठी ही संकल्पना चांगली आहे. त्यातून नवीन लोक संपर्कात येतात.
- जिग्नेश सरोदे, आयटीयन्स
को-वर्किंग स्पेस वापर वाढीची कारणे
१) घरून काम करण्यासाठी पुरेशी जागा नाही
२) कंपनीचे ऑफिस बंद झाले
३) काही दिवसांपुरतीच ऑफिसची गरज
४) को-वर्किंगचे भाडे ऑफिसकडून दिले जाते
५) घरातील सेटअपचा खर्च परवडत नाही
६) महिन्यातील काही दिवस क्लायंटला भेटण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी
७) वेगळ्या वातावरणात काम करण्याचा अनुभव मिळावा