पुणे (Pune) : कोरोनाकाळात (Covid-19) झालेल्या गैरसोयीवर मात करण्यासाठी स्वतःच्या मोठ्या घरांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पुण्यात गेल्या दीड वर्षांत विक्री झालेल्या घरांच्या आकडेवारीवरून ही बाब स्पष्ट झाली आहे. केवळ घरांचीच मागणी होत नसून, त्यात असलेल्या मूलभूत गरजा आता बदलल्या आहेत. शाश्वत बाबींसह घरात हिरवळही असावी, अशी अपेक्षा पुणेकर व्यक्त करीत आहेत. कोरोनामुळे ही गरज निर्माण झाल्याचे एका सर्व्हेतून स्पष्ट झाले आहे. (Demand For Sustainable Homes)
लॉकडाउनमुळे घरातील जीवनशैलीवर काय परिणाम झाला हे समजून घेण्यासाठी नुकत्याच केलेल्या सर्व्हेनुसार, ७० टक्क्यांहून अधिक पुणेकर आपल्या घरामध्ये हरित जागा आणि शाश्वत गोष्टींकडे कटाक्षाणे लक्ष देत आहेत. निसर्गाशी आपला कनेक्ट असावा, घरात आणि घराच्या बाहेर झाडी असावीत, असे नागरिकांना वाटत आहे. सर्व्हेत सहभागी झालेल्या पुण्यातील ७४ टक्के नागरिकांना वाटते की लॉकडाउनमुळे घरातील शाश्वत जीवनशैलीवर परिणाम झाला आहे. ७२ टक्के पुणेकरांनी घरात मोकळ्या जागा तयार करून तेथे झाडे लावली आहेत. तर लॉकडाउनच्या काळात आपले छंद जोपासण्यासाठी ३२ टक्के पुणेकरांनी वेळ काढून झाडांसाठी जागा तयार केली आहे. गोदरेज प्रॉपर्टीजने नुकत्याच केलेल्या ‘होम लिव्हेबिलिटी फॅक्टर्स’च्या अभ्यासातून या बाबी उघड झाल्या आहेत.
या बाबींचा समावेश असलेल्या घरांना मागणी :
वर्क फार्म होमसाठी जागा, स्टडी रूम्स, जिमसाठी सोय, प्ले एरिया, व्हिडिओ कॉलसाठी उत्तम प्रकाश, हवेशीर खोल्या या आणि अशा बऱ्याच गोष्टींसाठी, कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या गरजा पूर्ण करू शकणाऱ्या मोठ्या आणि प्रशस्त घरांची मागणी नागरिक करीत असल्याचे सर्व्हेत नमूद करण्यात आले आहे.
घरांबाबतचा दृष्टिकोन बदलला...
- अत्यावश्यक सेवांच्या जवळ असलेल्या मोकळ्या जागांची मागणी वाढली
- घर खरेदीदारांच्या विविध गरजा पूर्ण होणारे घर असावे
- घरमालक त्यांच्या गरजांमध्ये अधिक निवडक झाले
- घरांकडून फक्त राहण्याच्या जागेपेक्षा अधिक अपेक्षा
- वैयक्तिक स्वास्थ्य मिळण्यासाठी छंदांची जोपासना
- छंद शिकण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी जागा हवी
सर्व्हेतील मुद्दे - नागरिकांनी दिलेला प्रतिसाद (टक्क्यांत)
- पुन्हा वर्क फार्म ऑफीस करण्यास उत्सुक - ८४
- घरात मोकळ्या जागा तयार करून तेथे झाडे लावली - ७२
- लॉकडाउनच्या काळात छंद जोपासण्यासाठी वेळ काढला - ३२
- लॉकडाउनमुळे घरातील शाश्वत जीवनशैलीवर परिणाम - ७४
घर खरेदी करणारे आता मूलभूत गरजेच्या पलीकडचा विचार करीत आहेत. विविध गरजा पूर्ण करणारे डिझाइन आणि स्मार्ट घरांची मागणी वाढली आहे. ही घरे केवळ तांत्रिकदृष्ट्या विकसित नाहीत तर सुरक्षितता आणि हिरवळ असणारे हवेत, असे नागरिकांना वाटत आहे. घरातील जीवन आता आरोग्य आणि तंदुरुस्तीवर केंद्रित झाले आहे. ज्यामुळे मुक्त आणि सुरक्षित राहण्याच्या वातावरणाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
- राकेश कुमार, मुख्य डिझाईन अधिकारी, गोदरेज प्रॉपर्टीज
मला पहिल्यापासून झाडांची आवड आहे. कोरोनाकाळात हा छंद आणखी जोपासता आला. घरात किंवा परिसरात झाडे असतील तर मन प्रसन्न राहते. चांगली हवा मिळते आणि पक्षांचा किलबिलाटही ऐकायला मिळतो. त्यामुळे मी घरात आणि इमारतीच्या टेरेसवर झाडी लावली आहेत.
- नेहा कुलकर्णी, गृहिणी