पुणे (Pune) : खेड तालुक्यात लष्कराच्या जागेतून प्रकल्प जात असल्यामुळे त्यांनी घेतलेल्या आक्षेपामुळे पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या (Pune - Nashik Highspeed Railway) बदललेल्या मार्गाचा सुधारित आराखडा तयार झाला आहे. सुमारे आठ ते नऊ किलोमीटर लोहमार्गात बदल झाला आहे.
का घेतला निर्णय?
- खेड तालुक्यात लष्कराचे स्फोटके नष्ट करण्याचे केंद्र आहे
- पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पामुळे त्याला बाधा येत असल्याचा लष्कराकडून आक्षेप
- संबंधित गावांमधील मोजणी आणि संपादित करण्यात येणाऱ्या जागेचे मूल्यांकनही पूर्ण
- पण लष्कराने आक्षेप घेतल्याने तेथील काम थांबविले
- प्रकल्पातील खेड तालुक्यातील १२ गावांमधील मार्गाचे नव्याने आरेखन करण्याचा निर्णय
- मध्यंतरी सुधारित मार्गाचा आराखडा रेल्वे प्रशासनाला पाठविला
- रेल्वेचे अधिकारी अजय जैस्वाल यांच्याशी मध्यंतरी या संदर्भात बैठक
- त्यानुसार लष्कराच्या जागेऐवजी त्या जागेच्या बाजूने सुमारे आठ ते नऊ किलोमीटर रेल्वे मार्गात बदल
आणखी एक अडथळा दूर
पुणे जिल्ह्यातून या प्रकल्पासाठी आतापर्यंत २६हून अधिक खरेदीखते करण्यात आली आहेत. पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांत सर्वाधिक खरेदीखते पुणे जिल्ह्यातच झाली आहेत. आतापर्यंत २० हेक्टरपेक्षा जास्त जागा सहमतीने ताब्यात घेण्यात आली असल्याचे मध्यंतरी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे या प्रकल्पाचे काम मार्गी लागण्यात आणखी एक अडथळा दूर झाला आहे.
असा आहे प्रकल्प...
- महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातून रेल्वे मार्ग प्रस्तावित
- पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, आंबेगाव आणि जुन्नर अशा चार तालुक्यात मिळून एकूण ५४ गावांचा समावेश
- पुणे जिल्ह्यात पुणे या पहिल्या स्थानकासह हडपसर, मांजरी, वाघोली, आळंदी, चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा स्थानकांचा समावेश
- प्रमुख स्थानकांपैकी चाकण, मंचर, तसेच नारायणगाव स्थानके कृषी उत्पादन व खासगी मालवाहतूक टर्मिनल असणार
- राजगुरुनगर स्थानक फक्त प्रवासी रहदारीसाठी