पुणे (Pune) : मोठा गाजावाजा करून वाहतुकीस अडथळा ठरत असलेला चांदणी चौकातील जुना पूल जमीनदोस्त करण्यात आला. त्यानंतर प्रशासनाने धावपळ करत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र या चौकातून प्रवास करणाऱ्यांच्या मागील कोंडीचे शुक्लकाष्ठ संपण्याचे नाव घेत नाही.
सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान मुंबईहून साताऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या. त्यामुळे प्रवाशी आणि वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. साराऱ्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक सुरळीत होती.
प्रशासन काय म्हणतेय?
मुंबई-बंगळुरू मार्गावरील चांदणी चौक येथील पूल पाडल्यानंतर लेन वाढविण्यासाठी स्फोटकाने लगतचा खडक फोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. सोमवारी (ता. २) दुपारी दोन टप्प्यात या मार्गावरील वाहतूक बंद (ब्लॉक) ठेवण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले होते.
पूल पडल्यानंतर आता लगतचे खडक फोडायचे काम हाती घेतले आहे. यासाठी सोमवारी व मंगळवारी दुपारी बारा व दोन वाजता स्फोट केले जाणार आहेत. यासाठी दोन्ही बाजूची वाहतूक दोनशे मीटर अंतरावर वीस-वीस मिनिटांसाठी रोखली जाईल. खडक फुटल्यानंतर तत्काळ दगड हटवून सध्याचा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. दरम्यान, खडक फोडून जागा उपलब्ध झाल्यानंतर दोन लेनच्या डांबरीकरणाचे काम तातडीने पूर्ण केले जाणार आहे. यामुळे येत्या चार ते पाच दिवसात एकूण पाच लेन उपलब्ध होण्याची शक्यता आहे.