पुणे (Pune) : चांदणी चौकातील (Chandni Chowk) वाहतूक कोंडीचा प्रश्न नागरिकांनी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासमोर मांडला. शुक्रवारी रात्री ८ वाजता मुख्यमंत्री शिंदे हे सातारा येथे निघाले असताना चांदणी चौकाजवळ त्यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर राज्याच्या मुख्य सचिवांसह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देऊन उपाययोजना करण्यास सांगितले.
चांदणी चौक येथे मागील काही महिन्यांपासून होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त आहेत. याबाबत नागरिकांनी वारंवार प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यासह विविध स्तरावर प्रश्न मांडला. तरीही हा प्रश्न सुटण्यास अद्याप तयार नाही. त्यामुळे अखेर नागरिकांचा संयम सुटला. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे हे शुक्रवारी रात्री साताऱ्याकडे जात होते. त्यांचा ताफा रात्री आठ वाजता चांदणी चौकाजवळ सुस खिंड येथे आला. त्यावेळी वाहतूक पोलिसांनी नागरिकांची वाहने थांबवून मुख्यमंत्री शिंदे यांच्या ताफ्याला वाट करून देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काही संघटना व नागरिकांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी त्यांना थांबण्याची विनंती केली. त्यानुसार शिंदे यांनी तेथे थांबून काही वेळ नागरिकांशी संवाद साधला. तेव्हा नागरिकांनी चांदणी चौक येथील उड्डाणपुलाच्या कामामुळे होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीची समस्या मांडली. शिंदे यांनी तत्काळ संबंधित सर्व आस्थापनांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांदणी चौकातील फ्लायओव्हरपाशी होणाऱ्या वाहतूक कोंडीची पाहणी करून प्रवाशांची समस्या सोडवण्याचे आदेश दिले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी वाहतूक कोंडी संदर्भात पुणे महापालिका आयुक्त, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, नॅशनल हायवे प्राधिकरण आणि राज्याचे मुख्य सचिव यांना फोन करून प्रवाशांची समस्या दूर करण्यास सांगितले. त्यानुसार शनिवारी चांदणी चौकात संबंधित आस्थापनांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्याचा अहवाल तयार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला जाणार आहे.