Pune News पुणे : चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे (Chandani Chowk) काम मार्गी लागल्यानंतर आता याठिकाणी पुणे महापालिकेतर्फे (PMC) छत्रपती शिवाजी महाराज यांचा २० फूट उंचीच्या पुतळ्याचा समावेश असलेल्या हिंदवी स्वराज्य निर्मिती शिल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी स्थायी समितीने ६ कोटी ५६ लाख रुपये खर्चास मान्यता दिली आहे.
चांदणी चौकाकडून वारजेकडे जाणारा रस्ता आणि साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्यामध्ये महापालिकेला ५ हजार ५४२ चौरस मीटर मोकळी जागा उपलब्ध झालेली आहे. त्याठिकाणी हिंदवी स्वराज्य निर्मिती शिल्प उभारण्यात येणार आहे. महापालिकेने या कामासाठी वास्तुविशारद सतीश कांबळे यांची नेमणूक केली आहे. त्यांनी या कामाचा आराखडा सादर केला असून, त्यास मान्यता देण्यात आली आहे.
या कामासाठी अर्थसंकल्पात पाच कोटी रुपयांची तरतूद केली आहे. टेंडर मागवली असता त्यामध्ये सर्वात कमी रकमेची ६ कोटी ५६ लाख रुपयांची टेंडर प्राप्त झाली. त्यास शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. या वेळी शहर अभियंता प्रशांत वाघमारे, भवन विभागाचे अधिक्षक अभियंता युवराज देशमुख उपस्थित होते.
कसे असणार शिल्प
- स्टोन क्लाउडिंगचे प्रवेशद्वार उभारणार
- कमळाच्या पाकळ्यांच्या आकारातील कारंजे बसविणार
- त्यामध्ये १७ फूट उंचीच्या चौथरा बांधणार
- त्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा २० फूट उंचीचा ब्राँझचा पुतळा उभारणार
- स्मारकाच्या भोवती पिवळ्या व लाल रंगाच्या दगडांचा पादचारी मार्ग
- मुख्य प्रवेशद्वारासह दुसऱ्या बाजूला आणखी एक छोटे प्रवेशद्वार
- मुंबई, सातारा, कोथरूड या भागातून येणाऱ्या नागरिकांना हा पुतळा दिसणार