पुणे (Pune) : पुण्यात मेट्रोचे जाळ विस्तारत असताना पीएमपीचे सक्षमीकरण करण्यावर भर असून, पीएमपीच्या ताफ्यात मोदी सरकारच्या माध्यमातून १ हजार नव्या ई-बस मिळाव्यात, यासाठी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एचडी कुमारस्वामी यांना प्रस्ताव देण्यात आला आहे, तसेच पुणे शहरातील बसची संख्या, आवश्यकता आणि भविष्यातील गरज, यासंदर्भात चर्चा केली. बसच्या प्रस्तावावर कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी दिली.
शहरात मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यांतर्गत वनाज ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दोन मार्गावरील प्रवासी सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. या दोन्ही मार्गिकांची एकूण लांबी ३२ किलोमीटर आहे. त्यातच खडकवासला ते खराडी आणि नळस्टॉप ते माणिकबाग या दोन नव्या उन्नत मार्गिकांनाही राज्याच्या मंत्रिमंडळाने परवानगी दिली आहे, तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ या तत्त्वावर शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेचे काम सध्या सुरू आहे. शहरात एकीकडे मेट्रोचे जाळे विस्तारत असताना दुसरीकडे पीएमपीच्या सक्षमीकरणालाही प्राधान्य देणे आवश्यक आहे. पीएमपीतील बसची संख्या प्रवासी संख्येच्या तुलनेत कमी आहे. पीएमपीच्या बसमधून रोज सुमारे १३ लाख प्रवाशांचा प्रवास होतो, मात्र हा प्रवास हा दाटीवाटीने होतो. प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी किमान ३,००० बसची आवश्यकता आहे. सध्या पीएमपीच्या ताफ्यात केवळ १६५० बस आहेत. त्यामुळे बसची संख्या वाढविणे आवश्यक आहे.
पीएमपीच्या ताफ्यातील संख्या, आवश्यकता आणि भविष्यातील गरज लक्षात घेता एक हजार गाड्या घेण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्र्यांना देण्यात आला आहे. त्यासंदर्भात तातडीने सकारात्मक कार्यवाही करण्याचे आदेश केंद्रीय अवजड मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
- मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री