पुणे (Pune) : अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) संदर्भात दिलेल्या निकाल प्रकरणांबाबतची चौकशी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) सुरू केली आहे. या चौकशीदरम्यान वढू बुद्रुक येथील एका जमिनीसंदर्भातील प्रकरणाबाबत शिरूरच्या तहसिलदारांना पत्र पाठवून या प्रकरणाची माहिती मागवली आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) भूसंपादनातील प्रकरणांवर विभागीय आयुक्तांकडे सुनावण्या घेतल्या जात होत्या. या प्रकरणी भूसंपादनाच्या मोबदल्यात प्रत्यक्ष आठ लाखांची लाच घेताना अतिरीक्त विभागीय आयुक्त यांना ‘सीबीआय’ने थेट कार्यालयीन दालनात छापा टाकून रंगेहाथ पकडले आहे.
तपासाच्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्तांनी भूसंपादनाच्या आत्तापर्यंत दिलेल्या निकालांबाबत चौकशी सुरू केली आहे. वढू बुद्रुक येथील देवस्थान जमिनीचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना दिलेल्या निकालाबाबतची तक्रार प्राप्त झाल्याने ‘सीबीआय’च्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणातदेखील चौकशी सुरू केली आहे.
त्यासाठी ‘सीबीआय’ने शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना पत्र पाठवून संबंधित जमिनीच्या कागदपत्रांची मागणी केली आहे. याबाबत म्हस्के यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.
वढू बुद्रुक येथील वक्फ बोर्डाची १९ एकर जागा (वर्ग २) आहे. देवस्थान ईनामी जमीन १८६२ ची सनद असताना अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी ती जमीन खासगी लोकांच्या नावे करून दिली आहे. त्या संदर्भातील निकालाची कागदपत्रे वक्फ बोर्डाने सादर केली आहेत. या प्रकरणाचा तपास करण्याची मागणीदेखील बोर्डाने प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार ‘सीबीआय’ने चौकशी सुरू केली आहे.