पुणे (Pune) : ओला आणि उबर कॅबसेवांच्या धर्तीवर शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये ठराविक अंतरासाठी प्रवाशांना इलेक्ट्रिक मोटारद्वारे (ई-कॅब E-Cab) सेवा देण्याचे नियोजन पीएमपीने (PMP) महापालिकेच्या (PMC) मदतीने केले होते. त्यासाठी पहिल्या टप्यांत १०० कार भाडे तत्त्वावर घेऊन त्याद्वारे सेवा दिली जाणार होती. काही मोटार उत्पादक कंपन्यांनीही त्यासाठी पीएमपीकडे संपर्क साधला होता. पण आता नव्या अध्यक्षांचा कामाचा सूर पाहता पीएमपीची बहुचर्चित कॅब सेवा अंमलबजावणीपूर्वीच बारगळणार, अशी चिन्हे आहेत.
ठेकेदारांवरील पीएमपीचा वाढता खर्च कमी करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. कॅब सेवा याचाच भाग असल्याने पीएमपी प्रशासन कॅब सेवा सुरू न करण्याच्या मानसिकतेत आहे. याबाबत पीएमपीने अधिकृत निर्णय जाहीर केला नसला तरीही ही सेवा बारगळली असल्याचे स्पष्ट संकेत काही वरिष्ठ अधिकारी देत आहेत.
पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी त्यासाठी पुढाकार घेत एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट देखील मागविले होते. कॅबच्या दराविषयी चर्चा देखील झाली होती. मात्र, या योजनेला पीएमपीचे काही अधिकारी आणि स्वयंसेवी संस्था, रिक्षा संघटांनीनीही तीव्र विरोध केला होता.
शहर, उपनगर आणि लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी पीएमपीच्या बस पुरेशा संख्येने उपलब्ध होतील, याकडे प्रशासनाकडे प्राधान्याने लक्ष द्यावे. बसच्या वेळापत्रकाबद्दल प्रवाशांत विश्वासाहार्यता निर्माण करण्याची गरज आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याची जबाबदारी पीएमपीची असून खासगी कंपन्यांच्या धर्तीवर नफेखोरीच्या प्रकल्पांची अंमलबजावणी करणे, हे पीएमपीचे काम नाही, असेही विविध स्वयंसेवी संस्थांनी म्हटले आहे.
लवकरच कॅब सेवेसाठी संबंधित ठेकेदारांबरोबर चर्चा केली जाईल. यात जर पीएमपी व प्रवाशांचा हिताचा विचार झाला असेल तरच चर्चा पुढील टप्प्यावर जाईल. अन्यथा आम्ही हा विषय थांबवू.
- ओमप्रकाश बकोरिया, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे