पुणे (Pune) : रेल्वेच्या दोन्ही महत्त्वाकांक्षी ‘कॉरिडॉर’मध्ये पुण्याचा समावेश करण्यात आला आहे. पुणे ते लोणावळा (६३ किलोमीटर) या मार्गाचा समावेश अतिव्यस्त (उच्च घनता) ‘कॉरिडॉर’मध्ये व पुणे-सोलापूर-वाडी (४१२ किलोमीटर) या मार्गाचा समावेश ऊर्जा ‘कॉरिडॉर’मध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या सात ते आठ वर्षांत लोणावळा-पुणे-सोलापूर-वाडी या ४७५ किलोमीटरच्या अंतरावर तिसरी व चौथी मार्गिका असणार आहे. परिणामी रेल्वे वाहतूक वाढून गतिमान होईल.
देशाचा अर्थसंकल्प गुरुवारी मांडण्यात आला. तिन्ही ‘कॉरिडॉर’च्या माध्यमातून रेल्वेने जवळपास ४० हजार किलोमीटर अंतराचे नवीन ट्रॅक बांधले जाणार आहेत. ज्या मार्गांवर दोन मार्गिका आहेत, तिथे चार मार्गिका केल्या जातील, तर ज्या मार्गांवर चार मार्गिका आहेत, त्या मार्गांवर सहा मार्गिका केल्या जाणार आहेत. यामुळे रेल्वे गाड्यांची संख्या तर वाढेलच शिवाय रेल्वेची गती देखील वाढणार आहे. रेल्वे प्रवास गतिमान होण्यासाठी मार्गिकांची संख्या वाढविणे अत्यंत उपयोगी पडणार आहे.
रेल्वेत तीन ‘कॉरिडॉर’ होतील. यात पहिला कॉरिडॉर हा ऊर्जा, सिमेंट व खनिज असा आहे, दुसरा ‘हाय डेन्सिटी’चा असणार आहे तर तिसरा ‘पोर्ट कनेक्टिव्हिटी कॉरिडॉर’ असणार आहे. या तीन ‘कॉरिडॉर’पैकी दोनमध्ये पुण्याचा समावेश केला आहे.
‘डबल डायमंड स्लीप’ हटणार
पुणे स्थानकाच्या मुंबईच्या दिशेने असलेल्या यार्डमध्ये पाच ठिकाणी ‘डबल डायमंड स्लीप’ आहेत, ते काढण्यात येणार आहेत. त्याजागी ‘प्लेन टर्न आउट’ टाकण्यात येणार आहे. त्यामुळे देखभाल व दुरुस्तीची कामे सहजरित्या होण्यास मदत मिळेल. एक ट्रॅकवरून दुसऱ्या अथवा तिसऱ्या ट्रॅकवर जाण्यासाठी ‘डबल डायमंड स्लीप’चा वापर होतो. हा टर्नआउटचा महत्त्वाचा भाग आहे. यासाठी अर्थसंकल्पात २५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
महाराष्ट्रासाठी १५,५५४ कोटी
यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी २.५२ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्राच्या वाट्याला १५ हजार ५५४ कोटींची कामे केली जाणार आहेत. २०१४ पूर्वी महाराष्ट्रात वर्षाला ५८ किलोमीटर अंतराचे ट्रॅक टाकले जात होते. आता वर्षाला ४०० किलोमीटर अंतराचे ट्रॅक टाकले जात आहेत. राज्यात ११६ स्थानकांचा पुनर्विकास केला आहे. यात पुणे विभागातील १६ स्थानकांचा समावेश आहे.