पुणे (Pune) : जुन्या पुणे-मुंबई महामार्गासाठी लष्कराने जागा ताब्यात दिल्यानंतर महापालिकेने खडकीतील अडीच किलोमीटरचा रस्ता करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. या कामाच्या सल्लागार नियुक्तीसाठी प्रस्ताव मागितले आहेत. रस्ता रुंदीकरणाला जवळपास सात वर्षे उशीर झाल्याने याचा खर्च दुपटीने वाढून ९० कोटी रुपयांपर्यंत जाणार आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहराला जोडण्यासाठी जुना पुणे-मुंबई महामार्ग हा महत्त्वाचा रस्ता आहे. पिंपरीच्या हद्दीत दापोडीपर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे, पण पुणे महापालिकेच्या हद्दीत लष्कराकडून खडकीतील २.५ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या भूसंपादनासाठी जागा देण्यात आली नव्हती. अनेक वर्षांपासून यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरू होते. अंडी उबवणी केंद्रापासून ते संत तुकाराम महाराज पुलापर्यंत (हॅरिस ब्रीज) ४२ मीटर रुंदीचा रस्ता अपेक्षीत आहे. पण, सध्या हा रस्ता केवळ २१ मीटर रुंदीचा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.
या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी २०१५ पासून महापालिकेकडून पाठपुरावा सुरू होता. २०१६ मध्ये याचे टेंडर काढले होते, पण लष्कराकडून जागा ताब्यात नसल्याने काम होऊ शकले नव्हते. भूसंपादन लवकर करता यावे, लष्कराला अपेक्षीत मोबदला देता यावा यासाठी महापालिका, जिल्हा प्रशासन व लष्करामध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या. अखेर सात वर्षांनंतर लष्कराने २.५ किलोमीटरची जागा ताब्यात देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या रस्त्याचे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या बदल्यात विभागीय आयुक्त कार्यालयाकडून संरक्षण विभागाला येरवड्यातील १०.५८ एकर जागा लष्कराला हस्तांतर करण्यात आलेली आहे.
वाहतूक कोंडी कमी होणार
पुणे आणि पिंपरी-चिंचवड या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा रस्ता लवकर विकसित करणे गरजेचे आहे. त्यामुळे महापालिकेने या कामासाठी सल्लागार नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रस्ताव मागविले आहेत. यामध्ये रस्ता रुंदीकरण करणे, बीआरटी मार्ग विकसित करण, बोपोडी येथील अपूर्ण काम पूर्ण करणे अशी कामांसाठी सल्लागार नियुक्त केला जाणार आहे.
पूर्वीचे टेंडर रद्द
जुन्या पुणे-मुंबई रस्त्याचे काम करण्यासाठी सहा वर्षांपूर्वी टेंडर काढले होते. त्यावेळी या कामाचा खर्च सुमारे ४० ते ४५ कोटी रुपये इतका होता. पण गेल्या सहा वर्षांत या कामाचा खर्च वाढल्याने नव्याने मूल्यांकन केले आहे. जीएसटी वगळून प्रकल्पीय खर्च ७७ कोटी रुपये दाखविण्यात आला आहे. त्यामुळे जीएसटीसह हा खर्च ९० कोटीच्या जवळपास जाऊ शकतो.
जुना पुणे-मुंबई महामार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी लष्कराकडून जागा मिळाली आहे. २.१ किलोमीटरचे काम करण्यासाठी सल्लागार नियुक्त केला जाणार आहे. त्यासाठी प्रस्ताव मागविले असून, जीएसटीवगळून हा खर्च ७७ कोटी रुपये इतका अपेक्षीत आहे.
- व्ही. जी. कुलकर्णी, प्रमुख, पथ विभाग