पुणे (Pune) : आरटीओ प्रशासनाने (RTO) पुणे जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) सात हजार किलोमीटरच्या रस्त्यांवर ४८ ब्लॅक स्पॉट (अपघात प्रवण क्षेत्र) असल्याचा अहवाल दिला होता. त्या Black Spots ची सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्ती केली. आता तळेगाव ते चाकण (Talegaon - Chakan) दरम्यानच्या रस्त्यावर तीन ब्लॅक स्पॉट असून, त्याचीही तात्पुरती दुरुस्ती केली आहे.
ब्लॅक स्पॉटचे निकष?
ज्या रस्त्यांवर अपघातात १० व्यक्तींचा मृत्यू झाला असेल, त्या ठिकाणी आरटीओ प्रशासन ब्लॅक स्पॉट घोषित करतो.
सद्यःस्थिती काय?
१) यापूर्वी टप्पा दोनमध्ये शहरातील खडी मशिन चौक परिसराचा समावेश केला होता. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत असल्याने त्या ठिकाणी रस्त्याचे रुंदीकरण केले.
२) आता तळेगाव ते चाकण दरम्यानच्या रस्त्यांवर तीन ब्लॅक स्पॉट निश्चित केले आहेत. तेथे दुरुस्तीसोबत थर्मल प्लॅस्टिक पेंट, बोर्ड लावणे, साइडपट्ट्यांचे काम केले. येत्या काळात या रस्त्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून चौपदरीकरण होणार आहे.
पहिल्यांदाच सचिव पद
रस्ता सुरक्षा सप्ताहात राज्यातील विविध विभागांचा समावेश करण्यात आला. दरवर्षी रस्ते सुरक्षा सप्ताह समितीचे सचिव पद प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे असते. यंदा मात्र शासनाने सचिव पद सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिले आहे. त्यामुळे अपघात प्रवण क्षेत्र कमी करण्यासोबतच वाहनचालकांचे प्रबोधन करणे, विद्यार्थ्यांना सुरक्षित रस्ते प्रवासाचे धडे देणे आदी कार्यक्रम केले जात आहे. यासाठी एक हजार जनजागृतीपर पुस्तकांचे शाळांमध्ये वाटप केले जाणार आहे.
रस्ते सुरक्षा सप्ताहात झालेली कामे
- वाहनचालकांना सुरक्षित वाहन चालविण्याची माहिती दिली
- ठिकठिकाणी माहितीपर बॅनर्स लावले, माहितीपत्रके वाटप केली
- वाहनचालकांसाठी वाहतूक प्रबोधनपर कार्यशाळा घेतली
- रिफ्लेक्टर लावले
- शाळांमध्ये प्रबोधन केले
तीन ब्लॅक स्पॉट निश्चित केले असून, त्यांची तात्पुरती दुरुस्ती केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रस्ता चौपदरीकरणाच्या कामात हे ब्लॅक स्पॉट पूर्णपणे दुरुस्त होतील.
- बप्पा बहिर, अधीक्षक अभियंता तथा सचिव रस्ता सुरक्षा समिती, पुणे